DRDOतर्फे युद्धनौकांच्या संरक्षणासाठी प्रगत चाफ टेक्‍नॉलॉजी विकसित

पुणे – शत्रूकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून युद्धनौकांचे संरक्षण करण्यासाठी प्रगत चाफ टेक्‍नॉलॉजी विकसित केली आहे. जोधपूर येथील संरक्षण प्रयोगशाळा (डीएलजे) येथे हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, अरबी समुद्रात या तंत्रज्ञानाचे यशस्वी चाचणी घेण्यात आली असल्याची माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतर्फे (डीआरडीओ) देण्यात आली आहे.

जागतिक स्तरावर चाफ तंत्रज्ञान हे शत्रूच्या रडार आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी (आरएफ) क्षेपणास्त्र शोधणाऱ्या यंत्रणेपासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येते. मात्र जहाजांच्या सुरक्षेसाठी शत्रूची क्षेपणास्त्रे दूर करण्याचे क्षमता असणारे तंत्रज्ञान अत्यंत कमी देशांमध्ये विकसित करण्यात आले आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे भारत भविष्यातील धोक्‍यांचा सामना करण्यासाठी सज्ज झाले असल्याचे मत डीआरडीओ’तर्फे व्यक्त करण्यात आले आहे.

भारतीय नौदलाच्या गुणात्मक गरजा भागविणाऱ्या शॉर्ट रेंज चाफ रॉकेट (एसआरसीआर), मध्यम रेंज चाफ रॉकेट (एमआरसीआर) आणि लॉंग रेंज चाफ रॉकेट (एलआरसीआर) या तीन प्रकारात हे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले असून, अलीकडेच भारतीय नौदलाने अरबी समुद्रात भारतीय नौदल जहाजात केलेल्या चाचण्यांमधे तिन्ही प्रकारचे तंत्रज्ञानाची कामगिरी समाधानकारक असल्याचे दिसून आले. डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी भारतीय युद्धनौकांना सुरक्षित करण्यासाठी या महत्वाच्या तंत्रज्ञानाच्या स्वदेशी विकासामध्ये सहभागी संघांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.