पुणे – शहरात 1993 साली एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या झाली होती. या राठी हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष पुण्यातील गुन्हेगारीकडे वेधले गेले. गुन्ह्यातील आरोपींचा माग काढण्याचे मोठे आव्हान पुणे पोलिसांसमोर होते. यामध्ये त्यांना सर्वाधिक मदत केली ती आरोपींच्या रेखाचित्रांनी.
चित्रकार डॉ. गिरीश चरवड यांचे पोलिसांसाठी काढलेले ते पहिले रेखाचित्र होते. आरोपींचे रेखाचित्र काढण्याचा चरवड यांचा प्रवास गेल्या 25 वर्षांपासून अव्याहत सुरू असून, नुकताच नागपूरच्या संत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या ललितकला शाखेचीही “पीएचडी’ त्यांना प्रदान करण्यात आली आहे.
संत तुकडोजी महाराज विद्यापीठात डॉ. चरवड यांनी “चित्रकलेचे गुन्हे अन्वेषण शास्त्रामधील असलेले योगदान’ हा प्रबंध सादर केला होता. या विषयावर “पीएचडी’ मिळविणारे चरवड देशातील एकमेव रेखाचित्रकार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
याबाबत डॉ. चरवड म्हणाले, “गुन्हेगारांचे चित्र रेखाटण्यासाठी सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मात्र, अनेकदा रेखाचित्र काढण्यासाठी संगणकीय तंत्रज्ञानाला मर्यादा येतात.त्यातील त्रुटी लक्षात घेता, शब्द वर्णनावरून हाताने रेखाचित्र रेखाटणे उपयुक्त ठरते. एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याची, शरीराची विविध वैशिष्ट्ये, प्रत्यक्षदर्शींची वर्णन करण्याची मानसिकता, घटनेच्या वेळेची प्रकाशाची स्थिती इत्यादी बाबींचा एकत्रित विचार करून शब्दचित्राचे रेखाचित्र तयार करण्यासाठी लागणारी कौशल्ये यांचा विश्लेषणात्मक अभ्यास या प्रबंधात आहे.’