कोंडी फुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक 

मुंबई – राज्यात मुख्यमंत्रीपदावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी ठाम असल्याने विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवसांहून अधिक कालावधी उलटला तरी राज्यात सत्तास्थापनेचा अजून कोणीही दावा केलेला नाही. सत्ता स्थापनेसाठी मुंबई पासून दिल्लीपर्यंत राजकीय पक्षांच्या भेटीगाठी सुरू आहेत. दरम्यान, दिल्लीहून मुंबईत परतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलवली आहे. यावेळी भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

राज्यात सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही कायम आहे. अशातच काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना सरकार स्थापनेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर शिवसेनेने भाजपाशी संबंध तोडल्याचे जाहीर केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला असल्याचे विश्‍वासनीय सुत्रांकडून समजते. त्यामुळे शिवसेनला पाठींबा देण्याबाबतचा निर्णय झाला असला तरी शरद पवार ते इतक्‍यात जाहीर करणार नाहीत, असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात केंद्रातून हस्तक्षेप होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सूत्रांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट या प्रकरणात आता लक्ष घालणार असल्याचे समजते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.