मुंबई – भारतीय संघाचा माजी कर्णधार व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक (एनसीए) राहुल द्रविडने अखेर बीसीसीआयकडे मंगळवारी मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज दाखल केला. या पदावर सध्या रवी शास्त्री असून टी-20 विश्वकरंडक स्पर्धा संपल्यावर शास्त्री यांची मुदत संपत आहे. त्यासाठी नव्या व्यक्तीची नियुक्ती केली जाणार असून त्यासाठीच बीसीसीआयने 26 ऑक्टोबरपर्यंत इच्छूक व्यक्तींनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते.
यापूर्वी द्रविडने अनेकदा या पदावर काम करण्यास नकार दिला होता. त्याच्याशी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शहा यांनी आयपीएल स्पर्धेदरम्यान संवादही साधला होता. त्यावेळी द्रविडने अर्ज दाखल करण्यास होकार दिला होता. मात्र, त्यानंतर खुद्द गांगुली यांनी या पदावर काम करण्यास द्रविड फारसा इच्छुक नसल्याचे वक्तव्य करत याबाबतचा संभ्रम वाढवला होता.
मात्र, मंगळवारी द्रविडने बीसीसीआयकडे या पदासाठी अधिकृतरीत्या अर्ज दाखल केला आहे. द्रविडच्या नावावर एकमत झाले व सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींनंतर त्याचीच नियुक्ती केली गेली तर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या संचालक पदावर
व्ही.व्ही. एस लक्ष्मणची नियुक्ती केली जाणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.
दोन दिवसांपूर्वी द्रविडचा सहकारी गोलंदाजी प्रशिक्षक असलेला मुंबईचा क्रिकेटपटू पारस म्हांब्रे याने भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला. द्रविडसह अनिल कुंबळे, रिकी पॉंटिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशीही संवाद साधला होता. मात्र, या तिनही खेळाडूंनी या पदावर काम करण्यास नकार दिला होता.