पुणे – स्पोर्टसफील्ड मॅनेजमेंट आयोजित पहिल्या इंद्राणी बालन विंटर टी-20 लीग अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने कल्याण संघाचा 124 धावांनी पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. द गेमचेंजर्स संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.
या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पुनित बालन ग्रुप संघाने कल्याण इलेव्हन संघाचा 124 धावांनी पराभव केला. धीरज फटांगरे याने 49 चेंडूत 10 चौकार आणि 7 षटकारांसह 101 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजुने मेहूल पटेल याने 42 चेंडूत 7 चौकार व 6 षटकारांसह 89 धावा फटकावल्या. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 93 चेंडूत 190 धावांची भागिदारी करून संघाला 250 धावांचा डोंगर उभा करून दिला.
या आव्हानाचा पाठलाग करताना कल्याण इलेव्हन संघाचा डाव 20 षटकात 8 गडी गमावून 126 धावांवर मर्यादित राहिला. पुनित बालन ग्रुप संघाच्या धीरज मंत्री (2-5), सनी मारवाडी (2-13) आणि अक्षय दरेकर (2-28) यांनी अचूक गोलंदाजी केली.
दुसऱ्या सामन्यात द गेमचेंजर्स इलेव्हन संघाने आर्यन्स् क्रिकेट क्लब संघाचा 9 गडी राखून सहज पराभव केला. आर्यन्स् क्रिकेट क्लबने 20 षटकात 7 गडी गमावून 116 धावा धावफलकावर लावल्या. द गेमचेंजर्स इलेव्हनने हे आव्हान 9.5 षटकात व केवळ 1 गडी गमावून पूर्ण केले व सलग तिसरा विजय साकार केला.
संक्षिप्त धावफलक :
1) पुनित बालन ग्रुप : 20 षटकात 5 बाद 250 धावा. (धीरज फटांगरे 101, मेहूल पटेल 89, अनिकेत कुंभार 27, रोहीत गुगळे 2-47) वि. वि. कल्याण इलेव्हन ः 20 षटकात 8 बाद 126 धावा. (धर्मिन पटेल 43, चिन्मय कुरवे 20, धीरज मंत्री 2-5, सनी मारवाडी 2-13, अक्षय दरेकर 2-28). सामनावीर ः धीरज फटांगरे.
2) आर्यन्स् क्रिकेट क्लब ः 20 षटकात 7 बाद 116 धावा. (साहील कड 61, रिषी नाळे 17, सिद्धेश वारघंटे 3-24) पराभूत वि. द गेमचेंजर्स इलेव्हन ः 9.5 षटकात 1 बाद 119 धावा. (पवन शहा नाबाद 63, मिझान सय्यद नाबाद 35). सामनावीर – सिध्देश वारघंटे.