वाघोली (पुणे) – येथील बाईफ रस्त्यावरील दत्तप्रसाद नगरसह नवनाथनगरमधील रस्ता व ड्रेनेजचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. उपसरपंच महेंद्र भाडळे व माजी उपसरपंच समीर भाडळे यांनी स्वतःची एक गुंठा जागा दिली. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा ड्रेनेजचा प्रश्न सुटला आहे.
वाघोली येथील वॉर्ड क्रमांक 1 मधील रस्ते, ड्रेनेज, वीज, पाणी आदी बहुतांश विकासकामे ग्राम निधीमधून मार्गी लागली आहेत. बाईफ रस्त्या परिसरातील कामे पूर्ण झाली असून वॉर्डातील उर्वरित कामांना वेग आला आहे. नवनाथनगर येथील नागरिकांना भौगोलिक परिस्थितीमुळे ड्रेनेज करण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या. येथील नागरिकांनी ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावावा. यासाठी वाघोली ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजविले. ग्रामपंचायतीच्या वतीने सुद्धा नवनाथनगर येथील ड्रेनेज लाइनचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु प्रश्न मार्गी लागत नव्हता. त्यामुळे नागरिकांचा प्रश्न मार्गी लागावा या हेतूने उपसरपंच महेंद्र भाडळे व माजी उपसरपंच यांनी स्वतःची एक गुंठा जागा दिली व जिव्हाळ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला. यावेळी ड्रेनेजबरोबरच रस्त्याचे काम देखील करण्यात आले त्यामुळे दोन्ही प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागल्यामुळे येथील रहिवाशांनी उपसरपंच महेंद्र भाडळे व माजी उपसरपंच समीर भाडळे या दोन्ही बंधूंचे आभार मानले आहेत.
नवनाथनगर व दत्तप्रसादनगर डॉ. चमरे ते साळुंखे, दाभाडे वस्तीमधील प्रलंबित ड्रेनेज व रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, सरपंच वसुंधराताई उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी उपसरपंच समीर भाडळे व सदस्य शिवदास उबाळे, पूजा भाडळे यांच्या सहकार्याने वॉर्डातील विविध विकासकामे मार्गी लागली आहेत.
<
blockquote>नवनाथनगर येथे भौगोलिक कारणामुळे ड्रेनेज लाइन करणे शक्य नव्हते. टाकी बांधून त्यामध्ये सांडपाणी सोडणे हा पर्याय उपलब्ध होता. मात्र टाकी बांधण्यासाठी जागा कोणी द्यायची असा प्रश्न निर्माण झाला होता. मी व समीर भाडळे यांनी समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून एक गुंठा जागा दिली. त्यामुळे येथील रहिवाशांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागल्यामुळे समाधान मिळाले आहे.
– महेंद्र भाडळे उपसरपंच, वाघोली