डॉ. श्रीराम लागू यांना महापालिका मुख्यसभेत सदस्यांनी वाहिली श्रद्धांजली
पुणे – वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. श्रीराम लागू यांचा कलाक्षेत्रावर मोठा प्रभाव होता. ते कलाकार म्हणून जेवढे मोठे होते, तेवढेच ते माणूस म्हणून मोठे होते. त्यांचे कला क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही मोठे काम होते. त्यांच्या निधनामुळे संवेदनशील व्यक्तीमत्त्व हरपले आहे, अशा भावना व्यक्त करत नगरसेवकांनी डॉ. श्रीराम लागू यांना बुधवारी श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यसभा डॉ. लागू आणि आंब्याचे व्यापारी वसंत देसाई यांना श्रद्धांजली अर्पण करून तहकुब करण्यात आली. तत्पूर्वी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “डॉ. लागू यांचे विचार डोळ्यांसमोर ठेवून भविष्यात महापालिका सभागृहाचे कामकाज चालावे. त्यांचे चित्रपट संपूर्ण कुटुंबांने एकत्र बसून पहावे असे आहेत. त्यांनी आपल्या बहारदार आणि कसदार अभिनयातून समाज प्रबोधनाचे काम केले. कसदार अभिनयासोबतच संवेदनशील स्वभावामुळेच ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले. त्यांच्या निधनामुळे कला आणि सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे,’ अशा भावना सदस्यांनी व्यक्त केल्या.
यावेळी नगरसेवक जयंत भावे, ऍड. अविनाश साळवे, महेंद्र पठारे, नंदा लोणकर, मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, मनसे गटनेते वसंत मोरे, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, उपमहापौर सरस्वती शेंडगे आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भाषणे केली.
डॉ. लागूंचे यथोचित स्मारक करा
डॉ. श्रीराम लागू यांचे कला आणि सामाजिक क्षेत्रातील काम पाहता त्यांचे यथोचित असे स्मारक होणे गरजेचे आहे. आगामी अंदाजपत्रकात या स्मारकासाठी भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली. तर शहरातील लहान-मोठ्या लोककलाकारांना सराव करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. लागू यांच्या नावाचे कला केंद्र निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत सभागृहनेते धीरज घाटे यांनी यावेळी व्यक्त केले.