पिंपरी, (प्रतिनिधी) – येथील डॉ. डी. वाय पाटील (अभिमत) विद्यापीठाचा 15 वा पदवीप्रदान समारंभ शनिवारी (दि. 13) आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भारताचे माजी राष्ट्र्पती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इसरो) अध्यक्ष एस. सोमनाथ आणि सिम्बायोसिस इंटरनॅशनल अभिमत विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. एस. बी. मुजुमदार यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी दिली.
या समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 21 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात येईल. विविध विद्याशाखेतील 5 हजार 326 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येत असून यामध्ये 30 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 4 हजार 433 पदव्युत्तर पदवी, 853 पदवी व 10 पदविका या अशा एकूण 8 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पिंपरीचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र- कुलगुरू डॉ. स्मिता जाधव, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडणार आहे.