- खातेनिहाय चौकशीचे आदेश
- महापालिकेची बदनामी केल्याचे ताशेरे
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यावर आयुक्तांनी नाममात्र का असेना कारवाईचा आसूड उगारला असून त्यांचे पूर्ण आर्थिक अधिकार काढून घेण्यात आले आहेत. खातेनिहाय चौकशीचे आदेश पारित करतानाच डॉ. रॉय यांचे आर्थिक अधिकारही काढून घेण्यात आले आहेत. तसेच महापालिकेची बदनामी केल्याचे ताशेरेही ओढण्यात आले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेत डॉ. अनिल रॉय यांनी आपल्या बॅंक खात्यावर लाचेची रक्कम स्वीकारल्याचे पुराव्यानिशी उघड केले होते. यावर पंधरा दिवसांत कारवाईचे आश्वासन आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत दिले होते. यानंतर मात्र त्यांनी रॉय यांना पाठबळ देण्याचाच प्रयत्न केला; मात्र कामठे यांनी जनहित याचिका दाखल केल्यानंतर महापालिकेच्या प्रशासकीय पातळीवर लाचखोरीबाबत कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. प्रारंभिक चौकशीमध्ये रॉय यांनी रक्कम स्वीकारल्याचे सिद्ध झाल्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी रॉय यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश गुरुवारी (दि. 3 सप्टेंबर) काढले आहेत.
आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, श्री कन्स्ट्रक्शन या महापालिकेकडील नोंदणीकृत ठेकेदाराकडून रॉय यांनी रक्कम घेतल्याचे सूचित होत आहे. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 4 (1 अ) चा रॉय यांनी भंग केला आहे. तसेच त्यांनी त्यांचा मुलगा व्यवसाय करत असतानाही महापालिकेला कळविलेले नाही. या दोन्ही बाबी अपराधिक स्वरुपाच्या असून, त्यांनी सचोटी आणि कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध होत आहे. नागरी सेवा नियमांच्या विविध कलमांचा त्यांनी भंग केल्यामुळे तसेच स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग करून गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केले आहे. त्यांनी केलेल्या या वर्तनामुळे महापालिकेचीही बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश मी पारित करीत आहे. आयुक्तांनी दिलेल्या या आदेशामुळे रॉय यांची गच्छंती अटळ मानली जात आहे.
गंभीर स्वरुपाचा गुन्हा
आर्थिक अपहार शासकीय प्रणालीमध्ये अत्यंत गंभीर व फौजदारी स्वरुपाचा गुन्हा मानला जातो. त्यामुळे डॉ. रॉय यांची गच्छंती अटळ मानली जात आहे. निलंबन, बडतर्फी, इतर ठिकाणी कधीही काम न मिळणेची तरतूद यासह विविध गंभीर शिक्षेची तरतूद नागरी सेवा नियमावलीमध्ये प्रस्तूत करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी अपराध केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्यामुळे त्यांचा बचाव कदापी शक्यच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुलाचा व्यवसायही अडचणीत
डॉ. अनिल रॉय यांच्या मुलाचा व्यवसाय आहे. शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या कोणत्याही व्यक्तीने आपल्या कुटूंबातील कोणताही सदस्य खासगी व्यवसाय करत असल्यास त्याची माहिती संबंधित प्रणालीला कळविणे तसेच व्यवसाय करण्यापूर्वी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र रॉय यांनी मुलाच्या व्यवसायाबाबत महापलिकेला कोणतीही माहिती कळविली नसल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. यामुळे रॉय यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.