विविध सार्वजनिक उपक्रमांसह “पीएम केअर्स’लाही दिली देणगी
वैयक्तिक बचत, भेटवस्तूंच्या लिलावातून सार्वजनिक कार्यास आर्थिक हातभार
नवी दिल्ली – बालिकांचे शिक्षण ते गंगा नदीच्या स्वच्छतेच्या उपक्रमासह विविध सार्वजनिक कामासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक पातळीवर 103 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यामध्ये स्वतःची बचत आणि मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावातून मिळालेल्या निधीचा समावेश आहे, अशी महिती सूत्रांनी गुरुवारी दिली.
सर्वात अलीकडे कोविड-19 सारख्या सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आपत्ती, नैसर्गिक आपत्ती किंवा संकटाला तोंड देण्यासाठी उभारण्यात आलेल्या “पीएम केअर्स’ निधीमध्ये पंतप्रधानांनी 2.25 लाख रुपयांची देणगी दिली होती. मार्च महिन्यात उभारण्यात आलेल्या “पीएम-केअर्स’मध्ये 3,076.62 कोटी रुपयांची सार्वजनिक वर्गणी केवळ पहिल्या पाच दिवसातच जमा झाली होती.
पंतप्रधानांनी 2019 मध्ये कुंभमेळ्यात स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी उभारण्यात आलेल्या निधीमध्ये स्वतःच्या वैयक्तिक बचतीतून 21 लाख रुपयांची देणगी दिली होती. दक्षिण कोरियामध्ये 2019 मध्ये सेऊल शांतता पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी पुरस्काराची 1.30 कोटी रुपयांची सर्व रक्कम गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी सुरू केलेल्या “नमामी गंगे’ प्रकल्पासाठी देणगी म्हणून देऊन टाकली होती.
अलीकडेच पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तू आणि मानचिन्हांच्या लिलावातून मिळालेले 3.40 कोटी रुपयांचा निधीही नमामी गंगे उपक्रमासाठी देणगी म्हणून देण्यात आला. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा 2014 मध्ये राजीनामा दिल्यानंतर गुजरात सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या कन्यांच्या शिक्षणासाठी मोदी यांनी 21 लाख रुपयांची देणगी दिली होती.
तर मुख्यमंत्री असताना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावातून मिळालेले 89.96 कोटी रुपये कन्या केलावनी फंडसाठी दिले गेले. त्यानंतर 2015 पासून त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करायला मोदींनी सुरुवात केली. यातून मिळालेले 8.35 कोटी रुपये नमामी गंगे प्रकल्पासाठी दिले गेले.