बारामतीत भाजपाची कार्यकारिणी बैठक
बारामती – जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच बारामती नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली आहे. गट, गण तसेच वॉर्डावर लक्ष केंद्रित करून राष्ट्रवादीसमोर पर्याय निर्माण करण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. कोणत्याही दाबाला बळी न पडता सक्षमपणे लढा उभा करण्याच्या सूचना भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या बारामती तालुका कार्यकारिणीची बैठक तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी बूथ अभियान संपर्क, “हर घर तिरंगा, हा पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपले बूथमध्ये राबवाव्यात, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. बारामतीत सर्वसमावेशक विकासाचा अभाव आहे. ठेकेदारांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्याविरोधात आवाज उठून सक्षम लढा उभा करण्याची गरज आहे. आगामी निवडणुकांमध्ये भाजप सर्व ताकदीनिशी उतरेल. राष्ट्रवादी विरोधात कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल.
शेतकरी, कामगार, कष्टकरी यांनी निर्भयपणे आपल्या काही तक्रारी असतील तर पुढे यावे, असे आवाहन कचरे यांनी यावेळी केले. लोकसभा व विधानसभेसाठी भाजपाने लक्ष केंद्रित केले असून पूर्ण ताकदीनिशी या निवडणुका लढल्या जातील. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत असून त्याच्या तयारीकरिता माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे (दि.9) रोजी बारामती शहरात येणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साह दाटून आला आहे. पक्ष ठामपणे कार्यकर्त्यांचे पाठीमागे आहे.
लोकसभा व इतर सर्व निवडणुका आपण नक्की जिंकू, असा विश्वास जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीचे गण याविषयी अभ्यास करून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काम करून विजय मिळवू, असा निर्धार जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष युवराज तावरे यांनी केला. ठरावाचे वाचन युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ऍडव्हर्टाची ज्ञानेश्वर माने, जगदीश कोळेकर यांनी केले. सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस प्रमोद खराडे यांनी केले.
पुणे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद देवकाते यांनी आभार मानले. यावेळी सर्व गट प्रमुख व गण प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.