कोरेगाव भीमा -करोना आणि ओमायक्रॉन संक्रमणाचा धोका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून 1 जानेवारीला पेरणे येथील विजयरणस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम आरोग्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण खबरदारी घेत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक शासनाने काढले आहेत.
या परिपत्रकानुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर पेरणे परिसरात होणारी गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनामार्फत निर्बंध घालण्यात यावेत, तसेच विजयरणस्तंभास अभिवादनाच्या कार्यक्रमाबाबत सर्व अनुयायांनी काळजी घेणे आणि गांभीर्याने वागणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
विजयरणस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने अनुयायांनी पेरणे येथे न येता घरी राहूनच विजयरणस्तंभास अभिवादन करावे. स्थानिक प्रशासनाच्या आरोग्यविषयक निर्बंधांनुसार विजयरणस्तंभस्थळी मर्यादित संख्येत येणाऱ्या भाविकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. 60 वर्षावरील व्यक्ती व 10 वर्षांखालील मुलांना विजयरणस्तंभ येथे अभिवादनासाठी आणणे टाळावे.
विजयरणस्तंभ अभिवादन कार्यक्रमाठिकाणी व आसपासच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येऊ नयेत, तसेच कोणत्याही प्रकारची सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने व मोर्चे काढू नयेत. कोविड-19 आणि ओमायक्रॉन प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यक्रमादरम्यान शासन व स्थानिक प्रशासन स्तरावरून देण्यात येणाऱ्या सुचनांचेही काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही या परिपत्रकाद्वारे करण्यात आल्या आहेत.