मुंबई: राज्यात सध्या नितेश राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगत असल्याचे दिसत आहे. शिवसैनिक हल्लाप्रकरणी आमदार नीतेश राणे व संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी फेटाळून लावला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे अज्ञातस्थळी आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता यावरून मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे.
मुंबईतील चर्चगेट परिसरात नितेश राणे यांच्या फोटोसह एक बॅनर लावण्यात आला आहे. यात नितेश राणे हरवले असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यास एक कोंबडी बक्षीस म्हणून देण्यात येईल, असेही बॅनरवर नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, हे बॅनर कोणी लावले याबद्दल मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी खुनी हल्ला झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत एकूण सहा संशयिताना अटक केली आहे. यामध्ये स्वाभिमानचे पुणे येथील कार्यकर्ते सचिन सातपुते यांना अटक केल्यानंतर पोलिसांची चक्रे आमदार राणे व सावंत यांच्या दिशेने फिरली होती. त्यामुळे या दोघांनी २७ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
या प्रकरणात वापरण्यात आलेले मोबाईल हस्तगत करणे आवश्यक आहे, तसेच याची खास चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे आणि संदेश सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.