नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारे ‘आजचे शिवाजी: नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करण्यात आल्यानं विरोधकांनी सदर पुस्तक तातडीने परत घ्यावे अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे भाजपने देखील आता या पुस्तकापासून स्वतःला दूर केलं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, भाजपचे माध्यम सह-प्रतिनिधी संजय मयूख यांनी जय भगवान गोयल लिखित ‘आजचे शिवाजी: नरेंद्र मोदी’ या पुस्तकात मांडलेली मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं असून या पुस्तकाशी वा या पुस्तकाच्या प्रकाशकाशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय.
तत्पूर्वी, लेखक गोयल यांनी देखील या पुस्तकातील विवादित मजकूर हटवण्याची तयारी दर्शवली होती. तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी टिपणी करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं म्हंटल होत.