ताम्हिणी, लोणावळा, खंडाळा, सिंहगड किल्ला, भीमाशंकरला आल्यास स्थानिक पोलीस करणार कारवाई
पुणे – करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही काही हौशी तरुण पर्यटक लॉकडाऊनचे उल्लंघन करीत पर्यटनस्थळी दाखल होत आहेत, त्यांच्यावर स्थानिक पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पावसाळी पर्यटनास बंदी असल्याने घराबाहेर पडू नका, असे आवाहन पोलीस यंत्रणेकडून करण्यात आले असून त्या-त्या पर्यटनस्थळी स्थानिक पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
पाऊस सुरू झाला असला तरी मुंबई व पुणे येथील रहिवाशांना लोणावळा-खंडाळा, भीमाशंकर मुळशी, पवना व लगतच्या ठिकाणी व लॉकडाऊन उपाययोजनांमुळे भेट देता येणार नाही. पौड, हवेली, लोणावळा आणि जुन्नर, ओतूर आणि इतर पोलीस ठाण्यांनी गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात लोकांना नोटीस बजावण्यात आली आहे. पावसाळी पर्यटनाला बाहेर पडू नये, अशी विनंती पोलिसांकडून केली जात आहे.
मुंबई व पुणे येथील पर्यटकांत मुळशी, ताम्हिणी, लोणावळा, खंडाळा, पवना धरण, पानशेत, सिंहगड किल्ला, भीमाशंकर आणि आसपासच्या परिसरातील पर्यटन स्थळे लोकप्रिय आहेत. पावसाळ्यात आपल्या आवडते किल्ले, तलाव, नद्या, धबधबे, हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि इतर सहलीच्या ठिकाणी पर्यटक गर्दी करीत असतात परंतु, लॉकडाऊनच्या आदेशामुळे पर्यटकांना यंदा हा आनंद घेता येणार नाही, असे नोटिसीत नमूद केले आहे.
पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे रिसॉर्टस्, हिल स्टेशनवर असणारी बरीच हॉटेल्स, रोड साइड इटरीज, रेस्टॉरंट्स यांचा चांगला व्यवसाय होतो. यामुळे रेस्टॉरंटस्, हॉटेल आणि रिसॉर्ट ऑपरेटर्सच्या गटाने राज्य सरकारकडे योग्य ती काळजी व सुविधा उपलब्ध करुन देता सुरक्षिततेच्या नियमांतर्गत व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मागितली आहे. परंतु, सरकारने त्यांना अद्याप परवानगी दिलेली नाही. राज्य सरकार दि. 1 जुलैला लॉकडाऊनबाबत नवीन आदेश जारी करणार आहे. तोपर्यंत तरी पोलिसांना आदेशांचे पालन करावे लागणार आहे.
करोना विषाणूचा प्रसार पर्यटनस्थळांच्या भागात होऊ नये म्हणून पोलीस ठाण्यांनी नोटीस बजावल्या आहेत. लॉकडाऊन उपाययोजनांमुळे हॉटेल्स व रिसॉर्टस् अद्याप उघडण्यास परवानगी नाही. पर्यटनास परवानगी न देण्याचा निर्णय स्थानिक पोलिसांनी घेतला आहे. या स्थळांवर लोक मोठ्या संख्येने जमा होऊ शकतात यातून प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याने सदर निर्णय घेण्यात आला आहे.
– संदीप पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक