सासवड – जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला आहे. पुणे जिल्ह्यातही करोनाचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणुचा प्रसार होऊ नये म्हणून पुरंदर तालुक्यात विविध उपाययोजना प्रशासनाच्या वतीने केल्या आहेत.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गर्दीच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे. पुरंदर तहसील कार्यालयात गरीब, गरजू कुटुंबासाठी धान्य बॅंक कार्यान्वित करण्यात आली आहे.
सध्या पुरंदर तालुक्यात लॉकडाऊन असल्यामुळे बेघर, भिक्षुक लोकांसाठी राहण्याची व्यवस्था पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय जेजुरी येथे करण्यात आली आहे. परप्रांतीय मजुरांना ज्युबिलीयंट कंपनी नीरा, कडेपठार पतसंस्था जेजुरी, कानिफनाथ देवस्थान बोपगाव, सासवड जैन समाज संघ, होप फाउंडेशन पुणे, आधारवड संस्था सासवड, नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट, हिंद शक्ती सोशल फाउंडेशन वाघिरे विद्यालय, गावातील किराणा दुकानदार, पोलीस पाटील यांनी एकूण 1 हजार 800 धान्यांचे किट वाटप केले आहे.
जेजुरी येथे मार्तंड देवस्थानतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयात गोरगरीब, परप्रांतीय लोकांना दररोज सकाळी व संध्याकाळी अंदाजे 4 हजार 500 लोकांना जेवण पुरविण्यात येत आहे.
या आपात्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांच्यापैकी जे कोणी गरीब गरजुंना मदत करू इच्छितात. त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार रूपाली सरनौबत यांनी केले आहे.
करोनामुळे लॉकडाऊन झाले आहे. गोरगरीब, भिक्षुक, गरजूंना अन्नधान्याची कमतरता जाणवत आहे. प्रशासनाच्या वतीने वाटप केले जात आहे. मात्र, ज्यांना मदत करायची असेल त्यांनी पुरंदर तहसील कार्यालयाच्या वतीने धान्य बॅंक स्थापन केली आहे.
प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे किट स्वरूपात मदत करावी. हे कीट आम्ही सुचवू त्या व्यक्तीपर्यंत ते स्वतः जाऊन पोचवू शकतात. त्यांना शक्य नसेल तर ते किट आम्ही देखील पोहोचवू. मात्र, रक्कम स्वरूपात मदत प्रशासनाकडून स्वीकारली जात नाही. फक्त अन्नधान्याच्या किट स्वरूपातच मदत स्वीकारली जात आहे.
– रुपाली सरनोबत, तहसीलदार पुरंदर.