महापालिका आयुक्तांचे आदेश ः कुटुंबीयांनी मृतदेह नाकारल्यास दहन
पुणे – शहरातील करोनाग्रस्त रुग्णांवर महापालिकेकडून शहरातील विद्युत आणि गॅस दाहिन्यांमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर प्रशासनाकडून शहरातील आठ दफनभूमीही राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, ज्या मृत व्यक्तीचे नातेवाईक मृतदेह नाकारतील, अशा व्यक्तींचे अंत्यसंस्कारही दहन करून केले जाणार असल्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले आहेत.
या कामात सुसूत्रता आणण्यासाठी तसेच अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. यात, आयुक्तांनी अंत्यविधीसाठी शहरातील सुमारे 10 विद्युत दाहिन्या तसेच 11 गॅस दाहिन्या राखीव ठेवल्या आहेत. त्या शिवाय, शहरातील 8 क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत 14 ठिकाणी स्मशानभूमी राखीव ठेवण्यात आली आहे. तर कोणत्या हॉस्पिटलमधील रुग्णाचे कोणत्या ठिकाणी अंत्यसंस्कार करावेत, हे सुद्धा निश्चित करण्यात आले आहे.
धर्म कोणताही असला तरी दहनच…
करोनाबाधीत व्यक्तींच्या मृत्यू नंतर त्याच्या नातेवाईकांनी कायदेशीर हक्क सोडल्यास आणि अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्यास संबंधित व्यक्ती कोणत्याही धर्माची असली तरी, त्या व्यक्तीच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार दहन पध्दतीनेच करण्यात येणार असल्याचे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सुरूवातीला शहरात काही मृत्यू झाल्यानंतर निर्माण झालेल्या अडचणींवर तोडगा निघाला आहे.
सुरक्षा साधने देणार…
अंत्यविधींसाठी परिमंडळनिहाय अधिकारी नियुक्त करून देण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांवर अंत्यविधीच्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सुरक्षा साधणे, अंघोळीसाठी आवश्यक गरम पाणी, साबण, टॉवेल, नॅपकिन, औषध फवारणी सुविधा अशी सुरक्षा साधणे तातडीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.