न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट काही वर्षांपूर्वी कंपनीकरून बंद करण्यात आले होते. मात्र कंपनीची मालक एलॉन मस्क यांच्याकडे गेल्यानंतर ट्रम्प यांचे अकाऊंट रिस्टोअर करण्यात आले. एलॉन मस्क यांनी ट्विटरवर केलेल्या मतदानानंतर याबाबत जाहीरपणे माहितीदेखील दिली. मात्र हे सर्व घडल्यानंतर एक महत्वाची माहिती समोर येत आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटर वापरण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांचे अकाउंट रिस्टोअर केल्यानंतर एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये ट्रम्प म्हणाले, “माझ्याकडे ट्विटरवर परण्यासाठी कोणतेही कारण नाही. मला याचे कोणतेही कारण दिसत नाही. ट्विटर आता बॉट्स आणि बनावट खात्यांनी भरले आहे. यामुळे मला ज्या समस्यांना सामोरे जावे लागले ते अविश्वसनीय होते. यावेळी, त्यांच्या विधानात त्यांनी एलॉन मस्क यांचे देखील कौतुक केले, परंतु स्पष्टपणे सूचित केले की ते त्यांचे स्वत:चे ‘ट्रुथ सोशल’ वर राहतील.
6 जानेवारी 2021 रोजी अमेरिकेत दंगल झाली होती. यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना देखील जबाबदार धरण्यात आले होते. या दंगलीतील त्यांच्या भूमिकेबाबत अमेरिकेत आजही चौकशी सुरू आहे.
याच दरम्यान, ते आपल्या समर्थकांशी मुख्यतः ट्विटरद्वारे बोलत असे. यानंतर ट्रम्प यांना सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवरून बंदी घालण्यात आली होती. तेव्हापासून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष त्यांच्या सोशल नेटवर्किंग अॅप ट्रुथ सोशलवर सक्रिय आहेत.