नवी दिल्ली – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी 2020 रोजी भारत भेटीवर आले होते. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावर सरकारने किती खर्च केला याची माहिती आरटीआयद्वारे मागवण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या 36 तासांच्या भेटीवर केंद्राने 38 लाख रुपये खर्च केले होते, अशी माहिती प्रत्युत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने केंद्रीय माहिती आयोगाला दिली आहे. हा पैसा ट्रम्प यांचा मुक्काम, भोजन, सुरक्षेवर खर्च करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. भारताच्या पहिल्या भेटीत ट्रम्प यांनी 24-25 फेब्रुवारी 2020 दरम्यान त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका, जावई जेरेड कुशनर आणि अनेक उच्चपदस्थ अमेरिकन अधिकार्यांसह अहमदाबाद, आग्रा आणि दिल्लीला भेट दिली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये तीन तास घालवले. यादरम्यान, त्यांनी 22 किमीच्या रोड शोमध्ये भाग घेतला, साबरमती आश्रमात महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आणि नव्याने बांधलेल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मोठ्या ‘नमस्ते ट्रम्प’ बैठकीला संबोधित केले. त्यानंतर ट्रम्प 24 फेब्रुवारी 2020 रोजी ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे गेले. 25 फेब्रुवारी रोजी त्यांनी राजधानी दिल्लीला भेट दिली होती जिथे त्यांनी पंतप्रधान मोदींशी द्विपक्षीय चर्चा केली.
2020 च्या आरटीआयला 2022 मध्ये उत्तर –
मिशाल भठेना नावाच्या व्यक्तीने ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या खर्चाची माहिती आरटीआयद्वारे परराष्ट्र मंत्रालयाकडे मागितली होती. आरटीआयमध्ये विचारण्यात आले होते की, या दौऱ्यावर भारत सरकारने किती पैसे खर्च केले? अन्न, सुरक्षा, निवास, उड्डाणे, वाहतूक इत्यादींवर किती पैसा खर्च झाला? मिशाल भठेना यांनी 2020 मध्ये आरटीआय दाखल केला होता. त्याला आता प्रत्युत्तर दिले असून केंद्र सरकारकडून ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान, 38 लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.