डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला दणका; टिकटॉक आणि वीचॅटवर बंदी

वॉशिंग्टन : जगाला हतबल करून सोडणाऱ्या करोना विषाणूमुळे चीनविरोधात सातत्याने आक्रमक पवित्रा घेतलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला पुन्हा एकदा झटका दिला आहे. कारण अमेरिकेने चिनी ऍप टिकटॉक आणि वीचॅटचे मालकी हक्क असलेल्या कंपनीसोबत कोणताही व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इमरजन्सी इकॉनॉमिक पॉवर ऍक्‍ट अंतर्गत या आदेशाला मंजुरी दिली. बाईट डान्स या कंपनीकडे टिकटॉक आणि वीचॅटचे मालकी हक्क आहेत. या आदेशानंतर नंतर अमेरिकेत टिकटॉक आणि वीचॅटवर बंदी येणार आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षांनी गुरुवारी संध्याकाळी चिनी ऍप टिकटॉक आणि वीचॅटला 45 दिवसांच्या आत बंदी घालण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. याआधी अमेरिकन कर्मचाऱ्यांनी टिकटॉक न वापरण्याच्या आदेशाला सीनेटने एकमताने परवानगी दिली होती. बंदीच्या आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर ट्रम्प म्हणाले की, ही बंदी आवश्‍यक आहे, कारण ‘अविश्‍वासार्ह’ ऍप जसे की टिकटॉकमधून डेटा एकत्र करणं हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे.”

चिनी कम्युनिस्ट पक्षाला डेटा कलेक्‍शनमुळे अमेरिकेच्या नागरिकांची खासगी आणि मालकी हक्कांसंबंधाची माहिती मिळते. यामुळे चीन अमेरिकेच्या कर्मचारी आणि ठेकेदारांची ठिकाणे ट्रॅक करण्याची परवानगी मिळते. एवढेच नाही तर कम्युनिस्ट पार्टी वैयक्तिक माहितीचा वापर ब्लॅकमेलिंग किंवा कॉर्पोरेट हेरगिरीसाठी करु शकते, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच जर या कंपनीची विक्री झाली नाही तर 15 सप्टेंबरपर्यंत त्यावर अमेरिकेत बंदी येऊ शकते. तसेच जर याची विक्री झाली तर त्याचा वाटा अमेरिकेच्या करदात्यांनाही मिळायला हवा.

टिकटॉक, मायक्रोसॉफ्ट आणि वीचॅटच्या मालकांनी कोणतीही तात्काळ प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी म्हटले होते की, आम्ही ही कारवाई चिनच्या टेक्‍नॉलॉजीपासून वैयक्तिक ऍपपर्यंत वाढवत आहोत. पॉम्पियो यांनी टिकटॉक आणि वीचॅटचे नावही घेतले होते. दरम्यान गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर भारत सरकारने 59 चिनी ऍपवर बंदी घातली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.