दाम्पत्याला करोनाची बाधा
सविंदणे – कवठे यमाई (ता.शिरूर) येथे एका दाम्पत्याला करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून कवठे यमाई गावठाण केंद्रस्थानी धरून पाच किलोमीटर अंतराचा परिसर बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली. कवठे येमाई गाव 14 दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांनी सांगितले आहे. बेट भागातील टाकळी हाजी, जांबूत, मलठण, कवठे येमाई या भागांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेर फिरताना सावधानता बाळगावी. विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहन सरपंच अरूण मुंजाळ यांनी केले आहे.