मेलबर्न – ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाशी दोन हात करताना आपला खेळ सरसच करावा लागतो. मात्र, आम्हाला त्याचे दडपण नाही. उलट गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघ सातत्याने सरस कामगिरी करत असून या मालिकेतही आम्ही यजमान ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखू, असा विश्वास भारतीय महिला संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना हिने व्यक्त केला.
भारतीय महिला संघ सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येत्या मंगळवारपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेने भारतीय महिला संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर एकमेव आणि ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना होणार आहे.
त्यानंतर तीन टी-20 सामन्यांची मालिकाही होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारतीय महिला संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाविरुद्ध खेळणार आहे. ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर विलगीकरण कालावधी पूर्ण केल्यानंतर भारतीय महिला संघातील खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे.