मांडवगण फराटा-करोना व्हायरसच्या अफवेने चिकन खाण्याची धास्ती घेतल्याने ग्रामीण भागातील कोंबड्याची अत्यल्प दरात कराव्या लागणाऱ्या विक्रीने मेटाकुटीला आले आहेत. गावागावात तसेच ग्रामीण भागातील बाजारांमध्ये कोणी कोंबडी घेता का कोंबडी? आज अशी साद घालत पोल्ट्रीचालक पोल्ट्रया रिकाम्या करत आहेत. मेटाकुटीला आलेल्या या पोल्ट्रीधारकांची सुटका करोनाच्या अफवेतून होणार तरी कधी? असा सवाल निर्माण झाला आहे.
भाजीपाला विकावा तसा गावागावांत बाजारात जाऊन 20 ते 30 रुपये नगाने कोंबडी विकण्याची वेळ पोल्ट्री व्यावसायिकांवर आली आहे. हॉटेल, चिकन विक्रेते, हचरी, पशुखाद्य निर्मिती, सोयाबीन, मका विक्रेते यामुळे अडचणीत आले आहेत. करोनाचा त्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक कुक्कुटपालनासाठी पिल्ले विकत घेण्याचे धाडस करताना दिसत नाहीत. त्यामुळे हॅचरीमध्ये लाखो पिल्लांना मारण्याची वेळ हॅचरी व्यवसायिकावर आली असून ते आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहेत.
पुणे जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पण या अफवेने व्यवसाय डबघाईस आला आहे. मोठ्या व्यवसायिकांचे मोठ्या नुकसान आर्थिक नुकसान झाले आहे. चिकन खाणाऱ्यांनी अफवेचा मोठा धसका घेतल्यामुळे उत्पादन कमी झाले आहे. तसेच चिकनच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. वेळोवेळी पशुविभाग, आरोग्य विभाग यांनी चिकन खाण्यामुळे करोना होत नाही हे सिद्ध केले आहे. मात्र अफवेने खवय्यांनी पाठ फिरवली आहे.