पुणे: शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची भारतातील पहिली “फ्रेंडशिप कप किकेट स्पर्धा’ पुनीत बालन ग्रुप व माणिकचंद ऑक्सरिच’तर्फे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन कटारिया हायस्कूल या ठिकाणी आर.एम. धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा युवा उद्योजिका जान्हवी धारिवाल, आर.एम. धारिवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारीवाल, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन व इतर उपस्थित होते. या स्पर्धेत 18 संघ सहभागी झाले असून हवेत फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेच्या सुरुवातीला गणपतीची आरती करण्यात आली. तसेच, शिवजयंतीचे औचित्य साधत स्पर्धेचे आयोजन केल्याचे, संयोजकांनी सांगितले.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पुनीत बालन म्हणाले, शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणण्यासाठी स्पर्धा भरविण्यात आली आहे. सहभागी झालेल्या प्रत्येक संघातील स्पर्धकाला चुणूक दाखविण्याची संधी मिळणार आहे. या प्रकारातील स्पर्धा पहिल्यांदाच भरविण्यात आल्याने क्रिकेटचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे.
शोभा धारिवाल म्हणाल्या, या स्पर्धेमुळे नवीन खेळाडू निश्चितपणे उद्यास येणार आहेत. या स्पर्धेचा आनंद प्रत्येकाला लुटता येणार असून गणेशोत्सव मंडळांच्या सहभागामुळे सर्वांना ऊर्जा मिळणार आहे.
सेलिब्रेटी संघही सहभागी
या स्पर्धेत सेलिब्रेटी संघही सहभागी झाला असून प्रेक्षकांचे आकर्षण ठरला आहे. या संघामध्ये अभिनेता सौरव गोखले व इतर कलाकार सहभागी झाले आहेत. तसेच नाट्य, संगीत क्षेत्रातील कलाकारांचा समावेश आहे.
पुढील वर्षी राज्यातील संघ सहभागी होणार
यंदा प्रथमच “फ्रेंडशिप कप किकेट स्पर्धा’ भरविण्यात आली आहे. यामध्ये, पुण्यातील गणेशोत्सव मंडळे सहभागी झाली आहेत. मात्र, पुढील वर्षी या क्रिकेट लीगमध्ये राज्यातील संघांना सहभागी करुन घेणार असून मुंबईतील सिध्दिविनायक ट्रस्ट, लालबाग गणेशोत्सव मंडळही सहभागी होण्यास आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे, पुनीत बालन यांनी सांगितले.
स्पर्धेतील सहभागी गणेशोत्सव मंडळे
श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, छत्रपती राजाराम मंडळ, गरुड गणपती मंडळ, शितळादेवी मित्र मंडळ, श्री महालक्ष्मी मंदीर, श्री साई मित्र मंडळ, सेलिब्रेटी सुपरस्टार्स, माणिकचंद ऑक्सरीच, मिडिया रायटर्स हे संघ सहभागी झाले आहेत.