अभयसिंहराजे भोसले ग्रंथालयाचे कागदोपत्री अस्तित्व

संस्थेचा ठराव रद्द करण्याच्या हालचाली; दोषींवर कारवाई नाही

सातारा  – सातारा पालिकेच्या दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या नगर वाचनालयापासून राजकीय आकसाला बळी पडलेले श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले ग्रंथालय अजूनही कागदोपत्रीच अस्तित्वात आहे. या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये संबंधित ग्रंथालय समितीच्या ठरावातील अनेक त्रुटींचा उल्लेख आढळल्याने या संस्थेचा ठराव रद्द होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

साडेआठ लाख रुपयांची पुस्तके सातारा पालिकेने तब्बल सहा वर्षानंतर भांडार विभागात जमा करून घेतली. मात्र, ग्रंथालय शास्त्रानुसार या पुस्तकांना वर्गीकरण संकेतांक न मिळाल्याने तब्बल पाच हजार पुस्तके वाचकांच्या हातात जाण्याऐवजी पडून राहण्याची भीती आहे. सातारा शहराच्या उभारणीत योगदान देणाऱ्या कै. आ. अभयसिंहराजे भोसले यांच्या नावाचा ठराव रद्द करण्याची वेळ यावी, हे सातारकरांचे दुर्दैव आहे.

या ग्रंथालयाच्या आडोशाने मंगळवार तळ्यावर जे राजकीय बस्तान मांडण्याची समीकरणे मांडली गेली, त्यासाठी पालिकेने 45 लाखांचे व्यापारी संकुल व वाचनालयाची आठ लाखांची पुस्तके संबंधित संस्थेच्या हवाली केली. मात्र, या संस्थेला ग्रंथालय चालवायचा अनुभव नसताना मनोमीलनाच्या काळात वाचनसंस्कृतीला बळ देण्याचे कारण सांगत 2015-16 मध्ये आठ लाख रुपयांची पाच हजार 200 पुस्तकांची खरेदी करण्यात आली. स्थायी समितीत ठराव तीन लाखांचा असताना खरेदीचा मीटर आठ लाखांवर पोहोचला.

एकीकडे सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव महाराष्ट्रातल्या वाचन संस्कृतीला मार्गदर्शक ठरत असताना त्याच सातारा शहरात वाचन संस्कृतीला वाळवी लागवी, याचे सातारकरांना वैषम्य आहे. राजवाड्यावर “अ’ वर्ग नगरवाचनालय असताना पाचशे मीटरच्या अंतरात दुसरे ग्रंथालय नसावे हा नियम आहे. मात्र, “आपलेच दात अन्‌ आपलेच ओठ’ असल्याने बोलायचे कोणाला? भांडार विभागाने ही आठ लाखाची पुस्तके ताब्यात घेतली असली तरी दोषींवर कारवाई करण्याचे धाडस दाखवलेले नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×