अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू केले ऍडव्हान्स लॅंडिंग ग्राऊंड
विजयनगर : भारताने चीनबरोबरील तणावपूर्ण संबंधांदरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक ऍडव्हान्स लॅंडिंग ग्राऊंड सुरू केले आहे. चीनच्या सीमेनजीक विजयनगर येथे ऍडव्हान्स लॅंडिंग ग्राऊंडचा शुभारंभ करण्यात आला. पूर्व विभागाचे एअर कमांडर एअर मार्शल आर. डी. माथूर आणि भारतीय लष्कराचे पूर्व क्षेत्राचे कमांडर लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट एन-32 लॅंड करुन याची सुरुवात केली.
अरुणाचल प्रदेशमध्ये लष्करी पायाभूत सुविधांना चालना देण्याच्या उद्देशाने 8 ऍडव्हान्स लॅंडिंग ग्राऊंड बनवण्यात आले आहे. त्यातीलच विजयनगर ऍडव्हान्स लॅंडिंग ग्राऊंड आहे. दोन इंजिन असणाऱ्या एन-32 विमानाने सुमारे 3 वर्षांनंतर विजयनगर हवाई पट्टीवर उतरले. विजयनगर भारतात असले तरी त्याचा संपर्क नव्हता. अत्यंत दुर्गम असलेल्या या भागात रस्ते नसल्यामुळे तिथे पोहोचणे शक्यच नव्हते.
डोकाला पास जवळ एक रस्ता बनवला जात होता. त्याला चीनच्या लष्कराने विरोध करत हे काम थांबवले होते. त्यानंतर केंद्र सरकारने संरक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हवाई मार्ग विकसित करण्याची प्रक्रिया पुढे नेली. राज्यात 8 ऍडव्हान्स लॅंडिंग ग्राऊंडची दुरुस्ती करत ते आधुनिक केले जात आहे. ज्यावर सुमारे 1 हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
तत्पूर्वी, भारताने पासीघाट ऍडव्हान्सड लॅंडिंग ग्राऊंड सुरू केले होते. विजयनगर ऍडव्हान्सड लॅंडिंग ग्राऊंड अरुणाचल प्रदेशच्या चांगलांग जिल्ह्याजवळ आहे. भारताच्या उलट चीनने आपल्या सीमेपर्यंत चारचाकी वाहन घेऊन जाण्याइतपत रस्ते बनवले आहेत. इतकेच नव्हे तर चीनने डोकलाम वादानंतर आपल्या सैन्यांची संख्याही इथे वाढवली आहे.