डॉक्टरांच्या संपाने आरोग्य सेवा विस्कळीत

पुण्यात मोठ्या रुग्णालयांच्या ओपीडीही बंद : सायंकाळी 6 वाजेनंतर उघडले दवाखाने

पुणे – भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने (सीसीआयएम) च्या अधिसूचनेत आयुष डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ “इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) कडून शुक्रवारी करण्यात आलेल्या एक दिवसीय संपाला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानीच्या डॉक्टरांनी सहभाग घेतला नव्हता. सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेपुरता हा संप होता. दरम्यान, ओपीडी बंद असल्याने आरोग्य सेवा काहीशी विस्कळीत झाल्याचे दिसून आले.

 

 

 

शस्त्रक्रिया परवानगीची अधिसूचना मागे घ्यावी, या मागणीसाठी “आयएमए’ने शुक्रवारी देशभर बंद पुकारला होता. यामध्ये पुण्यातील “आयएमए’ च्या डॉक्टरांचा बऱ्यापैकी सहभाग होता. तातडीच्या सेवा वगळता सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडी सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. अनेक दवाखन्यांच्या वेळा या सायंकाळी साडेसहाच्या पुढे असतात, त्यामुळे सायंकाळी सहानंतर काहींनी क्लिनिक उघडल्याचे दिसून आले.

 

 

 

मोठ्या रुग्णालयांच्या ओपीडीही बंद होत्या; मात्र, तातडीच्या आरोग्य सेवा सुरू होत्या. तसेच कोविडच्या रुग्णांच्या तपासणी बंद ठेवण्यात आली नव्हती. त्यामुळे अत्यावश्यक उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांना सेवा देण्यात येत होती. तसेच रुग्णालयांत इतर सेवाही बऱ्यापैकी सुरू ठेवण्यात आल्या होत्या.

 

 

“आयएमए’चा संप पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 100 टक्के यशस्वी झाला. राज्यातील 1 लाख 15 हजार ऍलोपॅथीचे डॉक्टर सहभागी झाले होते. यावेळी तातडीच्या सेवा वगळल्या होत्या. तसेच 36 शासकीय आणि खासगी महाविद्यालयांतील 25 हजार वैद्यकीय विद्यार्थी, दहा हजार पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थी सहभागी झाले. डॉक्टरांनी आंदोलन केले नाही किंवा मोर्चा काढला नाही. “आयएमए’ च्या 45 हजार डॉक्टरांचा संपात समावेश होता.

– डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष “आयएमए’, महाराष्ट्र

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.