नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा आव्हान दिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून मला आणि विरोधातील अन्य आवाज बंद करण्याचे यांनी कारस्थान रचले आहे व ते पूर्णपणे दबावाचे राकारण करत आहेत. मात्र काय करायचे ते करा, आम्ही घाबरणार नाही असे राहुल यांनी म्हटले आहे.
नॅशनल हेराल्डबद्दल बोलायचे झाले तर हे संपूर्ण प्रकरण दबाव टाकण्याचे आणि घाबरवण्याचे आहे. थोड्याशा दबावाने आम्ही गप्प बसू असे मोदी आणि शहा यांना वाटते. मात्र असे होणार नाही. त्यांना लोकशाहीच्या विरोधात जे काही करायचे ते त्यांनी करावे. मात्र देश, लोकशाही आणि या देशातील सदभावना कायम राखण्यासाठी आम्ही आमची लढाई सुरूच ठेवू. पळून जाण्याच्या गोष्टी आम्ही नाही तेच करत आहेत.
आम्ही पळून जाणार नाही. आम्ही मोदींना घाबरतही नाही. त्यांना काय करायचे ते करू द्या. आम्हाला काही फरक पडत नाही असेही राहुल यांनी म्हटले. ते पुढे म्हणाले की देशाचे रक्षण करणे, लोकशाहीचे रक्षण करणे हे माझे काम आहे व ते मी करत राहणार.