हडपसर ग्लायडिंग सेंटर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
हडपसर- कोविड-१९ मुळे गेल्या दोन वर्षापासून जगभरातील व्यक्तीमध्ये लक्षणीय भावनिक आणि मानसिक संघर्ष निर्माण झाला आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी तसेच निरोगी शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी योगाच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य पद्धतीचा अवलंब करण्याची अधिक गरज आहे. असे मत माजी नगरसेवक मारुतीआबा तुपे यांनी व्यक्त केले .
आज आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील धर्मवीर शंभूराजे योगा ग्रुप व माजी नगरसेवक मारुतीआबा तुपे यांच्या वतीने हडपसर ग्लायडिंग सेंटर या ठिकाणी भव्य योग शिबिर आयोजित करण्यात आले होते .
मानवतेसाठी योग ही या योग दिनाची थीम होती .योगाचार्य आनंत झांबरे यांनी उपस्थितांना योग दिनाचे दैनंदिन जीवनात असणारे महत्त्व पटवून दिले दैनंदिन योगा करण्याने आपली प्रकृती सदृढ राहते व मन प्रसन्न राहते यासाठी रोज योगा व प्राणायाम यांचा अभ्यास केला पाहिजे .असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांचे सहकारी विठ्ठल गायकवाड व नारायणी ताई यांनी शारीरिक कसरती प्राणायम योगासने यांची प्रात्यक्षिके करून सर्वांकडून करून घेतली. योग शिबिरासाठी हडपसर व परिसरातील दि महाराष्ट्र अकॅडमी ,लक्ष अकॅडमी , कमांडो अकॅडमी , स्वराज्य अकॅडमी ,नवचैतन्य हास्य योग परिवार ,तुकाईमाता योगा ग्रुप,भेकराईनगर योग सामाजिक संस्था तसेच इतर सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या होत्या.
याप्रसंगी विकास रासकर ,जीवन जाधव ,विजय मोरे ,महेश ससाणे,अमित गायकवाड ,विकास गदादे व स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते योग शिबिराचे आयोजन नगरसेवक मारुती आबा तुपे युवा प्रतिष्ठान मार्फत करण्यात आले.