नव्या सरकारमध्ये मला कोणतीही जबाबदारी देऊ नका – अरुण जेटली यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

नवी दिल्ली – प्रकृतीच्या कारणामुळे नव्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची जबाबदारी देऊ नका, अशी विनंती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. यासंदर्भात नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र अरुण जेटली यांनी ट्‌विटरवर पोस्ट केले आहे.

मागील 18 महिन्यांपासून माझी प्रकृती खालावलेली आहे. अशा परिस्थितीत मी जबाबदारी पेलू शकणार नाही. त्यामुळे मला मंत्री बनवण्याबाबत कोणताही विचार करु नका, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. त्यामुळे ते नव्या मंत्रिमंडळात असणार की, नाही याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु होत्या. अखेर जेटली यांनीच मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, हे स्पष्ट करुन चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मागच्या पाच वर्षांपासून तुमच्या नेतृत्वाखालील सरकारचा भाग असणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. मला भरपूर काही शिकायला मिळाले. एनडीएच्या पहिल्या सरकारमध्येही पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपवली होती. मागच्या दीड वर्षात मला प्रकृती संदर्भातील वेगवेगळ्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागला. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांमुळे मी त्यातून बाहेर येऊ शकलो.

भविष्यात काही काळासाठी मला जबाबदारीपासून दूर ठेवावे. त्यामुळे मला उपचार आणि आरोग्यावर लक्ष केंद्रीत करता येईल, असे अरुण जेटली यांनी पत्रात म्हटले आहे. भाजपप्रणीत एनडीएच्या पहिल्या कार्यकाळात अरुण जेटली यांच्याकडे महत्वाची जबाबदारी होती. केंद्रीय अर्थमंत्री असण्याबरोबरच त्यांनी वेगवेगळ्या मंत्रालयाची जबाबदारी यशस्वीपणे हाताळली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी उद्या (30 मे) गुरुवारी पंतप्रधानपदाची पुन्हा एकदा शपथ घेणार आहेत. शपथविधीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. मंगळवारी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यात पाच तास बैठक झाली. त्यामुळे या बैठकीत मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची शक्‍यता आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.