राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा

मुंबई (प्रतिनीधी) – लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर पहिल्यादांच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली. त्यांच्या चर्चेचा तपशिल समजला नसला तरी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत मनसेचा समावेश होण्याच्या दृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत एकही उमेदवार उभा न करताना नरेंद्र मोदी व अमित शहा मुक्त भारताची हाक देत महाराष्ट्रात प्रचाराची राळ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उठवली होती. “लाव रे तो व्हीडिओ’हे त्यांचे वाक्‍य चांगलेच गाजले होते. मात्र, प्रत्यक्षात राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे मतांमध्ये परिवर्तन होऊ शकले नाही. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाच्या युतीपुढे त्यांना पराभव पत्करावा लागला.

विरोधकांच्या पराभवानंतर मंगळवारी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर बुधवारी राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुंबईत सिल्व्हर ओक येथे भेट घेतल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससह समविचारी पक्षांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूकीत आघाडीमध्ये मनसेलाही सोबत घेण्याबाबत महाआघाडीतील काही नेत्यांनी सूर आळवला होता. मात्र, त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×