तृणमूलचे आणखी 6 आमदार भाजपच्या वाटेवर

कोलकाता – लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर आज तृणमूल कॉंग्रेसच्या आणखी एका आमदाराने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. मोनीरुल इस्लाम असे या आमदाराचे नाव आहे. आतापर्यंत तीन आमदारांनी तृणमूलला राम राम केले असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर आणखी 6 आमदार आणि काही माजी खासदारही आगामी काही दिवसांमध्ये तृणमूल कॉंग्रेस पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. असा दावा भाजपच्या सूत्रांनी केला आहे.

“तृणमूलचे आणखी 6 आमदार लवकरच भाजपमध्ये येतील. काही महानगरपालिकांचे सदस्यही भाजपमध्ये येण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी थोडा काळ वाट बघावी लागेल.’ असे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.

केवळ आमदारच नव्हे, तर काही माजी खासदारही भाजपच्या संपर्कात असून त्यांनीही तृणमूलच्या गैरकारभाराविरोधात भाजपमध्ये सामील होण्याची तयारी दर्शवली आहे. 6 इच्छुक आमदारांपैकी एक दक्षिण बंगालमधील तर दोघे उत्तर बंगालमधील आहेत, असे या नेत्याने सांगितले.

भाजप नेते मुकुल रॉय यांचे चिरंजीव सुभरंगशु रॉय यांच्यासह 3 आमदार आणि 50 नगरसेवक मंगळवारी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी बहुतेकजण तृणमूल कॉंग्रेसमधील होते. लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 तर तृणमूलने पश्‍चिम बंगालमधील 22 जागा जिंकल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.