आमदार संजय जगताप यांची वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना
जेजुरी (वार्ताहर) – जेजुरी ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा द्या. तसेच त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी देखील घ्यावी, अशी सूचना आमदार संजय जगताप यांनी अधिकाऱ्यांना केली.
पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सोमवारी (दि. 21) रोजी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली. रुग्णालयाची पाहणी करून त्यांनी रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण हा माणूस आहे. याची जाणीव ठेवून सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा रुग्णांना मिळाल्या पाहिजेत, अशा सूचना वैद्यकीय आधीकारी व कर्मचारी यांना दिल्या.
यावेळी पुरंदर पंचायत समितीच्या सदस्य सुनीता कोलते, जेजुरी पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, गटनेते सचिन सोनवणे, आरोग्य विभागाच्या सभापती पौर्णिमा राऊत, रुक्मिणी जगताप, गणेश शिंदे, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, रमेश बयास, दिलीप गायकवाड, तसेच हरिदास रत्नपारखी, सुशील राऊत, अनिल पोकळे उपस्थित होते.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रबंध भिसे यांनी आमदार जगताप यांचे स्वागत केले. नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात. यासाठी मंगळवार (दि. 22) रोजी मुंबई मंत्रालयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समवेत खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप आदींच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने आमदार जगताप यांनी रुग्णालयाला भेट दिली.
समस्या सोडविणार
जेजुरी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ऑपरेशन थिएटरमध्ये वातानुकूलित व्यवस्था नाही, सोलर सिस्टीम गेली सहा वर्षांपासून धूळखात पडली आहेत. अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी निवास व्यवस्था नाही यासह अनेक समस्या सोडविण्यास प्रयत्नशील असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.