पुणे – सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न व शासन स्तरावरील कामे गतीने सोडवण्याबरोबरच या कामात लोकाभिमुखता व पारदर्शकता आणण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात “मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ (सीएमओ ऑफिस) कार्यान्वित करण्यात आला.
या कक्षाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महसूल उपायुक्त प्रताप जाधव, सामान्य प्रशासन उपायुक्त संजयसिंह चव्हाण, महसूल उपजिल्हाधिकारी स्नेहल बर्गे व अन्य अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
नागरिकांचे प्रश्न विभागीय स्तरावर सोडवण्यासाठी विभागीय स्तरावर कक्ष स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर अधिवेशनात केली होती. यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली.
महसूल उपायुक्त हे या कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी असतील. नायब तहसीलदार आणि लिपिक यांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. कक्षाचे कामकाज सोमवारपासून सुरू करण्यात आले, असे प्रशासनाने सांगितले आहे.
अशी होणार कामकाजाची अंमलबजावणी
जनतेने मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले अर्ज, निवेदने, संदर्भ या कक्षात स्वीकारून पोचपावती देण्यात येईल. अर्जावर क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही अपेक्षित अर्ज, निवेदने विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणाखालील संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे त्वरीत कार्यवाहीसाठी पाठवण्यात येतील.
शासन स्तरावरुन कार्यवाही होणे आवश्यक असलेल्या प्रकरणांशी संबंधित अर्ज अथवा निवेदने मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रधान सचिवांकडे सादर करण्यात येतील. क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे कार्यवाहीसाठी पाठवण्यात आलेले अर्ज, त्यासंदर्भात करण्यात आलेली कार्यवाही व प्रलंबित अर्जांची माहिती मुख्यमंत्री सचिवालय कक्षात दर महिन्याच्या 5 तारखेपूर्वी सादर करण्यात येणार आहे.