पिंपरी, दि. 17 – विषमुक्त शेती आणि शेतकऱ्यांना वाढीव दैनंदिन उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले मुळशीतील कृतीशील शेतकरी आणि अभिनव फार्मर्स क्लबचे ज्ञानेश्वर बोडके यांना मराठा सेवा संघाच्या वतीने “मराठा कृषी भूषण -2023 पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. शाश्वत शेतीमधील कार्याबद्दल त्यांना सपत्नीक मानपत्र प्रदान करत, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे हा कार्यक्रम नुकताच पार पडला.
अभिनव फार्मर्स क्लब, 1990 पासून ज्ञानेश्वर बोडके यांनी आधुनिक शेतीला प्राधान्य दिले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. फार्मर्स क्लब व शेतकरी गट निर्माण करुन शेतकऱ्यांना एकसंध केले. शेतकऱ्यांना अधिक बळकट व सक्षम करण्यासाठी त्यांचे संघटन निर्माण केले. देशी गाईंच्या शेण गोमूत्रापासून पिकांची आरास घरात पडू लागली. एकात्मिक सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून पिकविलेल्या शेतमाला राज्यभरातून मागणी वाढली. या मालाला राज्यभरात हक्काची बाजारपेठ निर्माण केली.
बोडके यांनी महिला सक्षामीकरणांतर्गत महिला बचत गटांना सोबतीला घेऊन,धान्य, दूध, यांची सुबकतेने निर्मिती केली. अगदी सर्वसामान्य कुटंबातून पुढे येत स्वत:चे शेतीमध्ये वेगळे स्थान निर्माण करत, इतरांनादेखील मदतीचा हात देत, त्यांनाही सुबत्तेच्या मार्गावर आणले. तसेच लाखो ग्राहकांना विषमुक्त अन्न उपलब्ध करून दिले त्यांच्या या कार्य कर्तृत्वावरूनच काळी माती हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या या कार्याचा राष्ट्रीय पातळीवरदेखील गौरव करण्यात आला असून, चार राष्ट्रीय पुरस्कार व 250 पेक्षा अधिक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. पुरस्काराला उत्तर देताना बोडके म्हणाले की, हा पुरस्कार माझ्या अभिनव फार्मर्स क्लबमधील शेतकऱ्यांचा, कुटुंबाचा व मदत करणाऱ्या प्रत्येकाचा आहे. पुढील काळात एक दोन एकर शेतीचा मालक आता करोडपती असणार आहे. जोपर्यंत जगातील माणसं जिवंत आहेत, तोपर्यंत शेतकरी टिकून राहणार आहे. करोना काळात 137 कोटीं जनतेला फक्त शेतकऱ्याने जगविले. आपणच आपला माल पिकवायचा आणि विकायचा. यामुळेच शेतकरी आत्महत्या थांबतील.
अर्चना चौधरी यांनी मानपत्राचे वाचन केले.