विश्रांतवाडीतील प्रकार; परवानगी असतानाही अडवणूक
येरवडा – पोलिसांची परवानगी असताना शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये विश्रांतवाडी पोलिसांनी डीजे जप्त करून थेट पोलीस स्टेशनला आणल्याने नाराज कार्यकर्त्यांनी छत्रपतींच्या पुतळ्यासह मिरवणुकीतील घोडागाडी पोलीस ठाण्यासमोर आणली. यावेळी महिलांसह शेकडो युवक तसेच मिरवणुकीतील कार्यकर्ते पोलीस स्टेशन समोर जमल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून मिरवणूक संपण्यासाठी काही काळ शिल्लक राहिला असताना एक स्पिकर लावण्यास परवानगी दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा जय भवानी… जय शिवाजीच्या जयघोषात मिरवणूक काढली. विश्रांतवाडीतील महाराजा ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मिरवणूक सायंकाळी काढण्यात येणार होती. कार्यकर्त्यांनी मिरवणुकीची तयारी केली. पोलिसांकडून मिरवणुकीची परवानगी घेतली होती. कार्यकर्त्यांनी चार स्पिकर लावल्यामुळे पोलिसांनी गाडी अडवून डीजे मशीन थेट पोलीस स्टेशनला आणले.
संतप्त कार्यकर्त्यांनी व भीमनगर वस्ती मधील महिलांनी घोडा गाडीसह मिरवणूक पोलीस स्टेशनला वळवली. कार्यकर्ते व पोलिसांमध्ये वादावादी सुरू होती. पोलीस अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शिवीगाळ करीत आर्वाच्या भाषा वापरल्याचा आरोप कार्यकर्त्यानी केला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन विनंती केल्यानंतरही पोलीस अधिकाऱ्यांनी ऐकले नाही. दोन तास पेक्षा अधिक वेळ महिला कार्यकर्त्यांसह नागरिक पोलीस स्टेशन समोर थांबून होते. पोलीस स्टेशन समोर नागरिक जमा होऊ लागल्यानंतरही पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले होते.
पोलीस निरीक्षकांबाबत नाराजी…
पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या कार्यपद्धतीवर सर्वसामान्य नागरिक देखील नाराज आहेत. कामानिमित्त भेटण्यासाठी गेलेल्या कुणाशीही ते नीट बोलत नाहीत. शिवीगाळ करून मोठ्या आवाजात बोलतात. दोन दिवसांपूर्वी एका राष्ट्रवादीच्या बड्या कार्यकर्त्याला देखील त्यांनी केबिन बाहेर काढले. पोलीस निरीक्षकांच्या कार्यपद्धतीला चोर नव्हे तर नागरिकच चांगले वैतागले आहेत.
महाराजा ग्रुपने चार स्पीकर लावल्यामुळे पोलीस निरीक्षकांनी कारवाई केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी महाराजांच्या मूर्तीसह मिरवणूकच पोलीस स्टेशनला आणली. आपण, मध्यस्थी करून त्यांना एक स्पीकर लावण्यास परवानगी दिली.
– अरुण आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक