उरूळीत पोलिसांचा मंडळांना इशारा
उरुळी कांचन- गणेशोत्सव काळात डीजे, डॉल्बी लावल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर व उरुळी कांचन पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासन व लोणी काळभोर पोलिसांच्या वतीने गणेश मंडळांना विशेष सूचना देण्यात आल्या आहे.
बंडगर व चौधरी म्हणाले की, डीजे व डॉल्बीला सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याने कोणत्याही गणेश मंडळांनी डिजे-डॉल्बीचा वापर करू नये. गणेश मंडळांनी पारंपारिक वाद्यांचाच वापर करावा. अन्यथा डिजे-डॉल्बीच्या मालक, चालकावर व गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. आवाजावर नियंत्रण ठेवावे. परिसरात आजारी व्यक्ती, लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तींना आवाजाचा त्रास होणार नाही, याची काळजी मंडळांनी घ्यावी. तशी तक्रार आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची प्रत्येक गणेश मंडळांनी काळजी घ्यावी. पूरग्रस्तांना गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून मदत करावी, असे आवाहनही चौधरी यांनी केले. यावेळी सचिन पवार, सोमनाथ चित्तारे, शशिकांत पवार, अमोल भोसले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.