#प्रभात_दीपोत्सव_२०२० : दिवाळी

– संपदा गणोरकर


दिग्या उपाशीपोटीच राबत होता… आज सकाळपासून ग्राहकांची चांगलीच गर्दी जमली होती हॉटेलात… अण्णाने सकाळच्या वेळी नोकर कमी असल्याने गिऱ्हाईक सांभाळून घेण्यासाठी दिग्याच्या नावाचा जणू धोशाच लावला होता… दिग्यासुद्धा प्रामाणिकपणे सगळ्या टेबलवर गिऱ्हाईकांना काय हवं-नको? हे बरोबर सांभाळत होता…

गावालगतच्या नाक्‍यावरच असलेल्या एका हॉटेलमध्ये दिग्या नुकताच काही दिवसांपूर्वी मदतनीस म्हणून रूजू झाला होता.

यंदाच्याच वर्षी सातवी पास केलेला, सावळा, सडपातळ, उंच, तरतरीत, मिसरुडाची चार-दोन केस तोंडावर फुटू पाहणारा दिग्या म्हणजेच, दिगंबर सोनाजी पाटील. हा घरच्या जबाबदारीचं ओझं कोवळ्या वयातच आपल्या खांद्यावर पेलून धरू पाहत होता.

करोना ही महामारी शहरातून झपाट्याने पाय पसरत कधी गावात शिरली हे कळलचं नाही. पण, कळलं तेव्हा फार उशीर झाला होता. दिग्याच्या बापावर करोनाने झडप घातलीय, हे कळण्याच्या आतच त्याचा बाप अन्‌ त्यापाठोपाठ त्याची आई, दिग्यावर पाठच्या दोन लहान बहिणी उमा आणि सुमा यांची जबाबदारी टाकत, दिग्याला पोरकं करून निघून गेले. सुदैवाने ही तिघेही बहीण-भावंडं, नव्या उमेदीची पोरं असल्याने म्हणा की, त्यांचं दैव बलवत्तर होतं म्हणून म्हणा पण, या करोनासारख्या महामारीच्या, मृत्यूच्या सावटाखालून सुखरूप बाहेर पडली होती.

शेतमजूर असलेला दिग्याचा बाप, सोनाजी हा नावाचाच पाटील राहिला होता. दारूच्या व्यसनापायी सारी पाटीलकी त्याने धुळीला मिळवून टाकली होती. त्याच्या हिश्‍श्‍याची सारी शेतजमीन, जी कधी काळी तो स्वतः मेहनतीने पिकवायचा, ती त्याने ठेक्‍यानं देऊन टाकली. त्यावर मिळणाऱ्या पैशांच्या मोबदल्यात त्यांच्या कुटुंबाचं बऱ्यापैकी भागत होतं. पण, दारूमुळे पोखरत चाललेलं शरीर जेव्हा, शेतीच्या मेहनतीच्या कामात साथ देईनासं झालं तेव्हा, सोनाजीने आपली सारी शेती ठेक्‍यानं चालवायला देऊन टाकली आणि हाती कथलाचा वाळा धरण्याची पाळी सोनाजीवर आली.

शेतीची कामे सुटल्यानंतर सोनाजी स्वतःचा दिवभराचा रिकामा वेळ घालवण्यासाठी म्हणून, अख्ख्या गावभर आपली पाटीलकी मिरवत गावात, कुणाकडे नवीन आलेल्या तर कधी नुकतंच लग्न होऊन आलेल्या पाव्हण्या-रावळ्याची चौकशी करण्याच्या निमित्ताने त्यांच्याकडील बाया-माणसाचा वावर बघत बसायचा. कधी नुसताच दिवसभर गावात हिंडायचा. तर कधी दारू पिऊन, पत्त्यांचा डाव मांडून, गावातील टवाळ पोरांसोबत जुगार खेळायचा.

दारू अन्‌ जुगार यांच्या नादाला लागल्याने त्याने स्वतःच्या शेतजमिनीच्या येणाऱ्या उत्पन्नावरही हात साफ करणं सुरू ठेवलं. शेवटी जे व्हायला नको, तेच घडलं. सोनाजी करोनाचा बळी ठरला अन्‌ जाताना त्याच्यामागे, कुटुंबासाठी कर्जाचा डोंगर सोडून गेला. वयात येऊ पाहणाऱ्या दिग्यावर मोठा होण्यापूर्वीच बापाच्या कर्जाचे हप्ते फेडण्याची वेळ येऊन ठेपली होती. घरात अन्नान्न दशा अन्‌ बाहेर करोना जगू देत नव्हता.

जेमतेम हायस्कूलात गेलेल्या दिग्याला, बापाची लोकांकडून घेतलेली कर्ज फेडायची आणि दोन लहान बहिणींना सांभाळून, शिक्षणासोबतच त्यांच्या पोट भरण्याचीही सोय करावी लागणार होती.
दुकानात कामावर ठेवून घेण्यासाठी कामगारांना वयाची अट असल्याने, सोनाजी गेल्यावर लहानग्या दिग्याला, कुठलेही काम देण्यास गावातील लोक नकार देत होते. पण, सरकारने हॉटेल्स सुरू करण्याचा निर्णय घेतला अन्‌ दिग्या मागचा-पुढचा विचार न करता बहिणींच्या आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पैसा कमावता यावा म्हणून, सरळ नाक्‍यावरच्या उडुपी हॉटेलमध्ये कप-बश्‍या विसळायला पोचला.

सुरुवातीला दिग्याला तिथेही काम देण्यासाठी नकार देणाऱ्या हॉटेलमालक अण्णाने, कामासाठी सलग दोन दिवस गावातून पायपीट करत येणाऱ्या दिग्याची जिद्द अन्‌ त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी भूक पाहून तिसऱ्या दिवशी त्याला नियमांची पर्वा न करता कामावर ठेवून घेतले. हॉटेलच्या आतील तसेच सभोवताली असलेला परिसर स्वच्छ ठेवणे, पिण्याचं पाणी भरून ठेवणे, टेबलं साफ ठेवणे आणि त्यासोबतच भांडीकुंडी स्वच्छ ठेवण्याचे काम दिग्याला मिळाले. सोबतच अण्णाने इतर नोकरांप्रमाणेच त्याच्या दोन वेळच्या जेवणाचीही सोय हॉटेलमध्ये लावून दिली होती. 

गडगंज संपत्तीचा मालक तसेच मायबापाला एकुलता एक असलेला अण्णा भला माणूस होता. पण, कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा खपवून न घेणारा, असा शिस्तप्रिय व्यक्‍तीही. कामावर यायला जराही उशीर झालेला त्याला खपत नसे. हे दिग्याला पुढच्या चारच दिवसांत कळून चुकलं होतं. दिग्याच्या सकाळ-संध्याकाळच्या खाण्याची सोय अण्णाने हॉटेलमध्येच करून दिल्याने त्याच्या खाण्यापिण्याच्या गोष्टींचा खर्च वाचणार होता. त्यामुळे येणाऱ्या पगारातून त्याने थोडे पैसे वाचवून त्याच्या वडिलांनी करून ठेवलेल्या कर्जाची परतफेड करण्याचा विचारही मनाशी पक्‍का करून टाकला होता.

मिळणाऱ्या पगाराच्या रकमेपेक्षाही दिग्याला, त्याची अन्‌ त्याच्या बहिणींची आजची भूक भागतेय, हेच समाधान जास्त होते. कारण, करोनासारख्या भयंकर महामारीच्या काळात कुटुंबातील सदस्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करताना अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. कित्येकांचे रोजगार गेले होते. कुणी निराशेच्या भरात आत्महत्या केल्याच्या बातम्याही गेल्या काही महिन्यांत त्याच्या कानावर पडत होत्या.
दिग्या विचार करत एका सायंकाळी बसून असताना त्याला जाणवलं की, आज, आपल्या लहान बहिणींना आणि आपल्याला आई-वडिलांचे छत्र हरवल्याचं दुःख जरी थोर असलं तरी, त्यांनी आपल्या तिघांसाठी राखून ठेवलेलं डोक्‍यावरचं हे छप्पर मात्र कायम आपलंच राहणार आहे. त्यामुळेच, इतर कुठल्याही गोष्टींची झळ ना पोचता अण्णाने देऊ केलेल्या कामामुळेच खरं तर आपण तिघेही भरल्यापोटी रोज रात्री शांत अन्‌ गाढ झोपू शकतोय. या विचारातच रात्री उशिरा केव्हातरी दिग्या समाधानाने त्याच्या बहिणींचे निजलेले कोवळे चेहरे पाहत झोपी गेला.

दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपला आणि हॉटेलात मिठाईचे काम वाढले. सगळे नोकर एकत्रित येऊन पदार्थांच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस राबू लागले. दिग्या हॉटेलच्या सगळ्या कामात धावून मदत करण्यासाठी धडपडत होता. खरं तर मेहनती दिग्याला, जुन्या नोकर माणसांकडून अण्णा दरवर्षी जादा कामाच्या मोबदल्यात प्रत्येकाला दिवाळी देतो म्हणून कळलं होतं. त्यालाही पैशांची गरज होतीच. म्हणून तोही जिवापाड मेहनत करत होता.

एक दिवस अचानक चार माणसं दुपारच्या सुमारास दिग्याच्या घराच्या दारात येऊन ठेपली. त्यांनी दिग्याच्या बहिणींना घराबाहेर हाकलून लावलं. घरातल्या सामानाची फेकाफेक केली. गावातीलच दिग्याच्या ओळखीतला एक माणूस दिग्याच्या नावाने ओरडत हॉटेलांत पोचला. “दिग्या, उमी-सुमी घराबाहेर रडत बसल्या आहेत. तुझं घर गेलं लेका.’ दिग्याने मागचा पुढचा विचार न करता अण्णाकडे फक्‍त नजरभर पाहिलं अन्‌ घराकडे धूम ठोकली.

बापाने राहते घरही गहाण टाकल्याचे त्याला घराच्या अंगणात आल्यावर तिथल्या उपस्थितांनी सांगितले. कर्जाची परतफेड वेळेत न झाल्याने नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी ती मंडळी तिथे पोचली होती. झालं, दिग्या अन्‌ त्याच्या बहिणी उघड्यावर आल्या. नाईलाजाने समानातील काही कामापुरत्या वस्तू उचलून तो अन्‌ त्याच्या बहिणी जड अंतःकरणाने त्यांचं राहतं घर सोडून गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात आसरा घ्यायला पोचले. ही बातमी थोड्याच वेळात गावभर पसरली. अन्‌ दिग्या कामाला होता त्या हॉटेलांतही.

आयुष्याचे उन्हाळे-पावसाळे पहात केस पांढरे केलेल्या अण्णाला पोरक्‍या दिग्याच्या अंगी असलेली जिद्द, चिकाटी आणि त्यासोबतच त्याच्या चेहऱ्यावरचं आई-वडील गेल्याचं दुःख अन्‌ बहिणींच्या जबाबदारीची जाणीव स्पष्ट दिसत होती.

दुःखी तर स्वतः अण्णाही होताच. त्याचं दुःख तर त्याच्या पाचवीलाच पुजलं होतं. अण्णाच्या नशिबात “बाप’ होण्याचं सुख नव्हतं. त्याच्यात दोष आहे हे त्याला त्याच्या लग्नानंतर दवाखान्याच्या पायऱ्या झिजवताना दोनच वर्षांत कळून चुकलं होतं. पण, घरातील कुणालाच, काहीही सांगण्याची त्याकाळी अण्णाची हिंमतच झाली नाही. शिवाय घराण्यातील एकुलता एक मुलगा असल्याने घराण्याचा वारसा लग्न करून पुढे नेण्याची जबाबदारी त्याचीच होती, हे तो जाणून होता. कुणाला काही सांगितले तर त्याची नाचक्‍की अन्‌ सोबतच घराची अब्रू जाणार हे अण्णाला ठाऊक होते. म्हणून त्याने गप्प राहणेच पसंत केले.

अण्णाने मात्र त्याची बायको सगुणाजवळ, तिला मातृत्व बहाल न करण्यासाठी तोच दोषी आहे, हे प्रामाणिकपणे कबूल करून टाकले होते. अण्णाच्या मनाचा मोठेपणा जाणून त्याच्यावर तन-मनाने प्रेम करणाऱ्या सगुणाने, नवऱ्याच्या पुरुषत्वाची ही बाजू आपल्या स्त्रीत्वाच्या जोरावर, बाहेरच्या जगात त्यांच्या घराण्याच्या आणि अण्णाच्या समाजातील अब्रुसाठी आयुष्यभर झाकून ठेवली. सत्य दोघाही नवरा बायकोला ठाऊक होतं, तरीही निव्वळ बायकोच्या म्हणजेच सगुणाबाईंच्या प्रेम, विश्‍वास आणि आग्रहाखातर अण्णाने उपास-तापास, व्रत-वैकल्य हे सारं केलं. तिलाही कधी, कशासाठी आडकाठी केली नाही. सादाला प्रतिसाद देत अण्णाने तिच्यासाठी म्हणून डॉक्‍टर-नीम-हकीम सारं-सारं केलं, पण गुण आला नाही.

अण्णा आयुष्याच्या संध्याकाळी, त्याच्यासाठी आजीवन झिजणाऱ्या, आपल्या बायकोच्या डोळ्यांत वाहणारी ममता बघत मनातून आपल्या फाटक्‍या नशिबाला दोष देत, कुढत जगण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हता. आडदांड, काळ्या-सावळ्या देहाच्या अण्णाला सगुणासारखी सुंदर, नाजूक, रूपवान स्त्री पत्नी म्हणून लाभली हे खरं तर अण्णाचं भाग्यच होतं.

कालांतराने एकेक करत घरातील मोठ्या वयाची पिकली पानं गळून पडली. अण्णाचा मोठा चौसोपी वाडा घरातील लोकांचा वावर कमी झाल्याने भकास वाटू लागला. अण्णाचा सगळा वेळ हॉटेलात जात होता पण, सगुणाबाईंना मात्र नोकर-चाकर मंडळी कामं करून निघून गेलीत की, रिकामं घर खायला उठायचे.
स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते, हे वाक्‍य अण्णाच्या पत्नीला, सगुणाबाईंना खऱ्या आयुष्यात तंतोतंत लागू पडत होतं.

कारण, काळानुसार थकत जाणारं अण्णाचं शरीर पाहून अण्णांबद्दलची, सगुणाबाईंना असलेली मायेची ओल अधिकच दृढ करू पाहत होतं. अण्णाला, तिच्यात आता फक्‍त एक आई दिसत होती, जी उतारवयात पदोपदी अण्णाची काळजी घेत होती.

अण्णासाठी मात्र सगुणाबाईंची हिच माया त्याच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरू पाहत होती. गरीब घरच्या सगुणाने लग्न करून सासरी आल्यावर, नवऱ्याची आणि सोबतच आपल्या माहेरची अब्रू राखताना आपलं अख्खं आयुष्यच अण्णासाठी वाहून घेतलं होतं. अण्णाच्या शारीरिक अक्षमतेबद्दल त्यांना कधीही, कसलाही कमीपणा तिने जाणवू दिला नव्हता की, उभ्या आयुष्यात त्यांच्याकडे कसली अवाजवी मागणीही केली नव्हती. कारण, मुळातच ती अण्णालाच आपलं सर्वस्व मानत होती. तिच्या याच प्रेमाची ताकत त्यांना सदैव त्यांच्या आयुष्याची ही पोकळी भरून काढण्यास बळ देत होती. वयोमानानुसार थकत चाललेल्या सगुणाबाईंची आई होण्याची नैसर्गिक इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही ही बोच अण्णाला कायम टोचत होती.

त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत काम केल्यावर हॉटेलचे शटर बंद करता करता अण्णाने, घरी निघालेल्या दिग्याला “दुसऱ्या दिवशी येताना सोबत बहिणींना पण घेऊन ये रे!’ म्हणून सुचवले आणि सगळे आपापल्या घरी निघून गेले. दिग्याला मात्र अण्णाने बहिणींना का बोलावून घेतले असेल, असा प्रश्‍न पडला. कदाचित दिवाळीच्या फराळाच्या तयारीत यांची मदत घेण्याचा विचार असेल अण्णाचा, असा मनाशीच विचार करत तो देवळाच्या पायरीजवळ आला.

राहतं घर गेल्यावर दिग्या, देवळातचं एका बाजूला थोडीशी ओसाड जागा पाहून त्याच्या बहिणींना घेऊन तिथे आपलं थोडं फार सामान थाटून जगण्याची धडपड करत, रात्रीचा आसरा म्हणून राहत होता. तिथं पोचल्यावर दिग्याने उमा अन्‌ सुमासाठी अण्णाने दिलेल्या सकाळच्या अन्‌ रात्रीच्या त्याच्या जेवणातून उरवून आणलेल्या पोळी-भाजीचं जेवण त्यांना खायला घातलं. सकाळपासूनच त्या दोघींनी काहीही खाल्लं नव्हतं. त्यामुळे दोघीही अधाशासारख्या जेवल्या. त्यांची जेवण उरकल्यावर दिग्याने त्या दोघींना जवळ बसवले.

त्या दोघींकडे पाहत दिग्या म्हणाला, “”उमा, सुमा.. उद्या माझ्यासोबत यायचं आहे तुम्हा दोघींना हॉटेलात. जादाचं काम येऊन पडलं आहे दिवाळीच्या तोंडावर म्हणून, कदाचित तुम्हाला दोघींनाही मदतीला बोलावून घेतलंय अण्णानं.”

दिग्याच्या या वाक्‍यावर त्या दोघीही उसळल्या. त्याला पुढे बोलू न देताच सुमा म्हणाली, “”दादा, आम्ही नक्‍कीच येऊ तुझ्या मदतीला अन्‌ पडेल ते काम करायला…”
तिला मधेच थांबवत दिग्या म्हणाला, “”ए सुमे, उमा अन्‌ तू अण्णा सांगेल ते काम नीट करायचं. शहाण्यासारखं वागायचं. आपल्या मनाने हॉटेलातले कुठलेही पदार्थ तोंडात टाकायचे नाही.”
त्यावर उमा लगेच म्हणाली, “”दादा, तू नको काळजी करू. आम्ही तुला कधीच खाली पाहायची वेळ आणणार नाही.” इतक्‍या लहान वयात ही समज असलेल्या आपल्या बहिणी पाहून दिग्याला भरून आले. त्याने दोन्ही बहिणींना मायेने जवळ घेतलं.

दुसऱ्या दिवशी तिघेही बहीण-भाऊ अण्णाच्या हॉटेलात पोहचले. पैशांच्या काउंटरवर अण्णाच्या बाजूला एक गोरीपान, रेखीव चेहऱ्याची, नाकाच्या दोन्ही बाजूला चमकी घातलेली, कपाळावर ठळक कुंकू त्याखाली किंचित हळद लावलेली, मंद स्मित करणारी, एक मध्यम वयाची स्त्री बसून होती. दिग्या तिला प्रथमच बघत होता. त्याच्या नजरेतील प्रश्‍नार्थक चिन्ह अण्णाला कळलं होतं.
अण्णाने दिग्याला जवळ येण्याचा इशारा केला. तो अण्णा जवळ जाऊन उभा राहिला. दिग्याच्या मागोमाग त्याच्या बहिणी उमा, सुमाही तिथे जाऊन उभ्या राहिल्या.

अण्णा, दिग्याची ओळख करून देत सगुणाबाईंना म्हणाले, “”हा आपला मुलगा अन्‌ या आपल्या मुली.” सगुणाबाई अण्णाकडे आणि दिग्या अन्‌ दिग्याच्या बहिणीही एकमेकांकडे प्रश्‍नार्थक नजरेने बघू लागले.
त्यांच्या मनातील गुंता सोडविण्यासाठी अण्णा पुढे बोलू लागला, “”सगुणाबाईंना मुलांचा खूप लळा आहे, मुलांनो. पण दुर्दैवाने मी तिला बाळ देऊ शकत नाही. आम्हाला जर मुलंबाळं असती तर आजच्या घडीला ती तुमच्याच वयाच्या आसपास किंवा कदाचित थोडी मोठी असती. पण, आज आम्ही दोघेही मोठ्ठ्या घरात एकटेच राहतो. देवाच्या दयेने पैसा बक्‍कळ आहे, पण तो खर्च करायलाच कुणी नाही रे! या…या सगुणाने आयुष्यभर माझं घर, अब्रू अन्‌ मला सांभाळलं, पण आता तिच्या उतारवयात, आमच्याकडे हक्‍काचं असं कुणी नाही जो तिला, मला सांभाळेल.” इतकं बोलून जाडजूड खोडासारखा थोराड अण्णा लहान मुलासारखा रडू लागला. सगुणाबाईंच्या डोळ्यांना तर कधीच धारा लागल्या होत्या.

हुंदक्‍याने दाटलेल्या गळ्याला मोकळं करत अण्णा पुढे बोलू लागला, “”बाळांनो! आज या करोनामुळे लोकांचं जीवनमान कमी होऊन गेलं आहे. आज आहोत, जगतोय, पण उद्याचा दिवस पाहू का नाही? अशी परिस्थिती. आर्थिक सुबत्ता कुणाच्याही कामी आली नाही. जीवितहानी टाळता आली नाही. माणूस, निसर्गाच्या कोपात पुरता भरडला गेला. निसर्गापुढे, आपल्या खुजेपणाची जाणीव काय असते हे मला नियतीने चांगलेच शिकवले. पुरुष असून माझ्या बायकोला मी एक बाळ देऊ शकत नाही यापेक्षा अजून वाईट काय असणार?” म्हणत अण्णाने सगुणाबाईंचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले अन्‌ म्हणाले, “”सगुणा मला माफ कर.

तुझी आई होण्याची स्त्रीसुलभ इच्छा मी आजवर पूर्ण करू शकलो नाही. कारण, तुझ्यासाठी जरी मी मूल दत्तक घेतलं असतं तर ते माझ्या कुटुंबातील लोकांना पचनी पडणार नव्हते, हे मला ठाऊक होतं. तूही माझ्याबाबतीतलं सत्य कळल्यावर, काळजावर दगड ठेवून घेतलास. कधीच कुठल्याही प्रकारचा हट्ट माझ्याकडे धरला नाहीस. पण, खरं सांगतो मी आतून रोज तीळ तीळ तुटत होतो गं! हा दिग्या हॉटेलात काम करायला आला अन्‌ माझ्या मनातला बाप मला स्वस्थ बसू देईनासा झाला. बिना मायबापाचं पोर आज बेघर अवस्थेत आपल्या दोन बहिणींना घेऊन जगत आहे. सगुणा, तुझी हरकत नसेल तर आपण या तिघाही भाऊ-बहिणींना दत्तक घेऊयात? बोल काय म्हणतेस?”

सगुणाबाईंनी अत्यंत आशाळभूत नजरेने एकदाच अण्णाकडे पाहिलं, त्यांची नाजूक जीवणी खुलली आणि त्या मुलांजवळ गेल्यात. दिग्याच्या डोक्‍यावर मायेने हात फिरवत त्यांनी, त्याच्या मागे उभ्या असलेल्या सुमा, उमाला उराशी कवटाळून घेतलं. “माझी पोरं.’ इतकंच वाक्‍य त्या बोलू शकल्या. मग फक्‍त त्यांचे डोळे बोलत राहिले.

त्यांची आई गेल्यावर त्यांना पहिल्यांदाच कुणी असं उराशी धरलं होतं. सगुणाबाईंना बिलगून त्या दोघीही आई-वडील अन्‌ त्यांचं राहतं घर गेल्यावर जे काही त्यांनी भोगलं होतं ते सारं आठवल्यानं म्हणा की, खूप दिवसांनी असा मायाळू स्पर्श त्यांना मिळाल्याने म्हणा पण हमसून-हमसून रडत होत्या. निःशब्द उभा असलेल्या दिग्याच्या डोळ्यात मात्र अनेक संमिश्र भाव तरळले होते.

अण्णाने पुढे होत, दिग्याला प्रेमाने जवळ घेतलं. त्याची पाठ थोपटली. अन्‌ म्हणाले, “”दिग्या, आजपासून तू एकटा नाहीस. तू आमचा मुलगा आहेस. तुझ्या मेहनती आणि जिद्दी स्वभावाला पाहून मी खूश झालोय. अरे लेका! माझ्यातलाच लहानपणीचा अण्णा पाहतो मी तुझ्यात.” असं म्हणून त्यांनी सगुणाबाईंकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला अन्‌ म्हणाले, “”सगुणे, आजपर्यंत कधी बोललो नाही. पण, आज मी हे कबूल करतो की, मलाही बाप व्हायचंय. सगुणाबाई लुगड्याचा पदर दाताखाली दाबत नव्या नवरीसारखी अगदीच गोड लाजल्या.

एकाचवेळी पाच चेहरे आनंदाने उजळून निघाले होते. अण्णाच्या हॉटेलात आता खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होणार होती…

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.