#प्रभात_दीपोत्सव_२०२० : भेट

– सुचित्रा पवार


तिन्हीसांज झाली होती. अस्वस्थपणे शालू उंबऱ्यातून स्वैपाकघरात अन पुन्हा अंगणात येरझाऱ्या घालत होती. आकाशात ढगांची गच्च दाटी झालेली अन अजूनच अंधारून आलेलं. गोठ्यात अंधार भुडुक होता अन शिवा – तिचा कारभारी गुडघ्यात मान घालून बसला होता. शेजारी सापती, घुंगुरमाळ उदास पडलेली बघून तिच्या पोटात कालवून येत होतं; पण…. पण ती हतबल होती.चूल पेटली होती. घरोघरी जनावरांच्या अंघोळीचा अन सजावटीचा कार्यक्रम सुरू होता. 

आज खिचडा! तिनेही चुलीवर खिचडा शिजत घातला होता. करडई उखळात कुटून दूध काढून ठेवले होते, खीर रटरटत होती; जनावरं ओढ्यावर नेऊन धुवून आणली होती, शिंगांना हुरमुस लावून रंगवली; पण तिला कशातच आनंद वाटत नव्हता. घरधण्याची तसली अवस्था बघून तिला उदास वाटत होतं. तिच्या परीनं तिनं समजूत काढली होती पण…. पण त्याच्यात काय फरक पडत नव्हता आणि कुणी समजूत काढून ती निघणारही नव्हती. गेलं आठ-दहा महिने झालं त्याचं शिवारातून, जितराबावरून लक्ष उडलं होतं. इतकंच काय स्वत:वरूनसुद्धा त्याचं लक्ष उडलं होतं.

सगळी कामं शालूनच पार पाडली होती. औंदा पेरणी पण शालूनंच पार पाडली होती. पण पिकं कितकीशी वाढलीत? हे बघायलासुद्धा तो शेतापर्यंत गेला नव्हता; अन का नाही अशी अवस्था होणार? त्याजागी कुणी असता तर त्याचीही अवस्था अशीच झाली असती!
शालू विचारात गढली. सुंदर आणि धन्या बरोबरच वाढलं होतं.आत्या सांगायच्या, सुंदरच्या आणि तिच्या कारभाऱ्याच्या साऱ्या कहाण्या!

घरच्या गाईपासूनच सुंदर झाला होता. नावाप्रमाणच सुंदर देखणा होता. पांढऱ्या शुभ्र सशासारखी कातडी, टपोरं डोळं, गुबगुबीत शरीर. शिवाला त्याचा खूप लळा होता. दिवसरात्र तो सुंदरला जपायचा, कुठून कुठून गवत आणायचा. कणिक, खुराक, गोठ्यात बसायला स्वच्छ जागा… एखाद दिवशी जरी सुंदर उदास वाटला तर शिवा शाळेतच जायचा नाही, सुंदरला माळावर पळवल्याशिवाय त्याला चैन पडायचा नाही. सुंदरन काही खाल्ल्‌याशिवाय शिवा तोंडात घास घ्यायचा नाही. सुंदर मोठा धष्टपुष्ट झाला अन शेतीची कामं करू लागला. शालू अन त्याच्या लग्नाच्या वेळीसुद्धा त्यानं सुंदरकडं एव्हढंस पण दुर्लक्ष केलं नव्हतं. वरातीच्या गाडीला तो सजून-धजून ओढत होता. तिथंच तिची सुंदरशी ओळख झाली होती.

सकाळी उठल्या उठल्या पहिलं तो सुंदरचंच दर्शन घ्यायचा. त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवायचा. तोही धण्याचं हात चाटायचा, तोंड वर करून लाड करून घ्यायचा. त्याच्यामागचं शेण सारून त्याला कोरड्या जागेत बांधून मगच धन्याच्या दिवसाची सुरुवात व्हायची. काळजाचा तुकडाच होता जणू! शिंगांना सुबक आकार, त्यांचा लाल रंग, कंडे, घुंगुरमाळ, बैलपोळ्यासाठी रंगीत झूल, रंगीत गोंडे कित्ती कित्ती हौस! सुंदरला काही झालं की, त्याचा जीव खालवर व्हायचा. सुंदरला चारापाणी केल्याशिवाय तो तोंडात घास घ्यायचा नाही.

दिवाळीत गोठा साफ करून रंगरंगोटी व्हायची, गोठ्यालाच दिव्याच्या माळा लावायच्या. पणत्यांचा प्रकाश गोठा उजळून टाकायचा. वसुबारसेला पूजा, पुरणपोळीचा घास असायचा सुंदरला.सुंदर जणू धाकटा भाऊच होता धन्याचा! बैलपोळ्याची तर त्याला कित्ती हौस! आठ दिवसापासूनच तो त्या तयारीत असायचा. लाडक्‍या सुंदरला सगळ्या माळावर हुंदडू द्यायचे. हिरव्यागार कुरणावर मनसोक्त चरून झालं की, मग आपोआपच तो ओढ्याकडं जायचा; मनसोक्‍त पाणी प्यायचा; मग कंबरभर पाण्यात उतरून तो सुंदरला स्वच्छ धुवायचा. आधीच स्वच्छ पांढरी त्याची कात अजूनच झळाळायची. शिवा आठ दिवस त्याला कुठल्याच कामाला लावत नसे. रस्त्यानं सुंदर निघाला की सगळे बघत उभं रहात. दररोज संध्याकाळी मीठ मिरच्यांनी दृष्ट उतरून चुलीत फेकायची. तिला पण सुंदरला जपावं लागायचं, सुंदरचा दु:स्वास धन्याला अजिबात खपायचा नाही.

खरे तर सुंदर दिसायला देखणा होताच पण तो कष्टाळू अन गुणी पण तितकाच होता. त्याला कधी चाबूक ओढलेला तिनं बघितलं नव्हतं. शेतीच्या कामाला नेहमी सुंदरच्या जोडीला दुसऱ्याचा बैल भाड्यानं असायचा, गाडी जुपताना पण भाड्याचाच बैल असायचा सुंदरच्या जोडीला; पण सुंदरला कुणी भाड्यानं मागायचं धाडस केलं नव्हतं; नव्हे- कुणी मागितला जरी असता तरी स्वतः तोच गेला असता, पण सुंदरला दिला नसता !

त्या दिवशी असाच बैलगाडीला जुंपून त्याला नेहमीप्रमाणं शेतात नेला. शेंगांच्या रानातून शेंगाची पोती आणायची होती. निम्या रस्त्यात गेल्यावर ठेच लागल्याचं निमित्त होऊन सुंदर रस्त्यात कोसळला. शिवाचा जीव हलला. गाडीवरून उतरून त्याला त्यानं चुचकारलं, पाठीवरून हात फिरवला पण सुंदर उठायचं नाव घेईना.तिथंच बैलगाडी सोडून दुसरा बैल रस्त्याकडेला बांधून तो सुंदरला उठवायचा प्रयत्नस्‌ करू लागला. पायात काटा मोडलाय का? पाहिला पण कुठं काहीच झालं नव्हतं. शिवाचं हातपाय गळून गेलं.तिथंच गळ्याला मिठी मारून त्यांन हंबरडा फोडला. निरव शांततेत शिवाचा हंबरडा दूरवर घुमत राहिला. रस्त्यावरून येणा-जाणाऱ्यांनी बातमी घरात पोहचवली. जागेवरच डॉक्‍टर आणला. डॉक्‍टरनं इंजेक्‍शन दिलं. हा -हा म्हणता गाव गोळा झाला, पण शिवाला काही सुचत नव्हतं. तो नुसता “सुंदर….सुंदर’ करत उसासे टाकत होता. संध्याकाळी हळू हळू चालवत कसा तरी सुंदरला घरापर्यंत आणला.

सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. कुणी म्हणलं करणी झाली, कुणी म्हणलं दिष्टवला. शिवा तर सुंदरशेजारुन रात्रंदिवस उठलाच नाही.सुंदरच्या टपोऱ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, तसा त्याचा धीर सुटला. त्यानं पण अन्नाचा कण घेतला नाही. अंगारा, धुपारा, दृष्ट काढून, औषधं बदलून झाली पण सुंदर शांत होता.

केविलवाणेपणानं तो मालकाकडं पाहत राही आणि एका सकाळी जमिनीवर मान टेकून सुंदर शांत झाला. शिवाने हंबरडा फोडला. कुणाचंही मन पिळवटून जावं, असंच आक्रीत घडलं होतं. शिवा वेडा व्हायचाच बाकी होता.

त्या दिवसापासून त्याची झोप उडाली. जेवणावरून स्वत:वरून, शिवारावरून मन उडलं. जिथं-तिथं सुंदरच्या आठवणी त्याचा पाठलाग करत. रात्री अपरात्री उठून तो गोठ्यात जाई आणि सुंदरच्या जागेवर विमनस्क बसून राही. लोकांनी समजूत काढली, शालुच्या माहेरच्यांनी समजूत काढली; पण तो स्वतःच्या मनाला समजावू शकत नव्हता की, सुंदर त्याच्या गोठ्यातून-जीवनातून गेलाय.

शालूला रात्रंदिवस धन्याची चिंता लागून राहिली. त्याचं मन तिलाही वळवता येत नव्हतं; कारण सुंदर त्याचं काळीज होतं अन काळजाशिवाय मनुष्य कसा जगेल? चालतं-बोलतं आत्माहीन प्रेतवत अवस्था होती शिवाची. तिला धास्ती लागून राहिली होती त्याच्या जीवाचं काही बरं वाईट नाही ना होणार?
देवाचा धावा रात्रंदिन चालूच होता.

गेल्या राखीपौर्णिमेला राखी बांधायला माहेरी गेल्यावर सहजच तिचं लक्ष गोठ्यातल्या वासराकड गेलं अन तिच्या सर्वांगातून एक अनामिक लहर चमकली.सुंदरचंच दुसरं रूप होतं ते! अन तिच्या मनात एक कल्पना आली. हा शेवटचा उपाय होता धन्याला सुंदरच्या आठवणीतून भानावर आणायचा.
तिनं भावाला-महादूला सविस्तर कल्पना दिली. बहिणीच्या संसाराची त्याला पण काळजी होतीच. प्रयत्न किती यशस्वी होणार हे तिला माहीत नव्हतं पण शिवाला दुःखातून सावरण्याचा हा एकच मार्ग तिच्याकडे शिल्लक राहिला होता. आणि म्हणूनच ती महादूची वाट बघत अस्वस्थपणे आत-बाहेर फेऱ्या घालत होती.

घुंगराच्या आवाजाने ती भानावर आली अन पटकन आरतीचं ताट आणायला आत गेली. लगबगीनं तिनं पाटीत खिचडा ओतला आणि उंबऱ्यावर येऊन सुंदर म्हणून हाक दिली. नवा कोरा रंगीत कंडा, कासरा अन घुंगुर बांधून महादू दारात वासराला घेऊन हजर होता. घुंगराचा आवाज अन “सुंदर’ हाक ऐकून शिवा दचकून गोठ्यातून बाहेर आला. शालूनं वासराला ओवाळून तोंडात खिरीचा घास दिला डोक्‍यावर हात फिरवला अन खिचडा खायला दिला. शिवा निश्‍चल होऊन पहात होता.

शालू वासराच्या पाठीवर हात फिरवत त्याच्याशी बोलत होती, “सुंदर तुझ्या धन्यानं काय अवस्था करून घीतल्या बघ, तूच समजवून सांग बा; मी कुणाकडं बघून जगू? झालं ती वाईटच! आम्हाला तर काय बरं वाटतंय का रं? पण त्याचा आपल्याजवळचा शेर तेव्हढाच हुता, तेला आपण काय करणार? आपण प्रयत्न केलंच ना? आता सावरायला हवं, तूच सावर तुझ्या धन्याला! ती बघ तुझी जागा…’ असं म्हणत शालूनं गोठ्यात त्याच्या जागेकडं बोट केलं तिचा कंठ दाटून आला; तिनं वासराच्या गळ्यात हताशपणे हात टाकले तिचे डोळे भरून वाहू लागले.

शिवाला त्याचं लहानपण आठवलं असाच तो सुंदरच्या गळ्यात हात टाकून बोलायचा. थेट सुंदरच होता तो दुसरा! तेच डोळे, तीच पांढरी शुभ्र सशासारखी गुबगुबीत अंगकांती…
“सुंदरऽऽऽ’ पुन्हा एकदा त्यानं आर्त हाक दिली… गळ्याला मिठी मारली लहान मुलासारखी अन अश्रूला वाट दिली. महादू गळ्यातल्या टॉवेलनं डोळे पुसत राहिला.

सुंदर शिवाचे हात प्रेमाने चाटू लागला अन मघापासून गच्च दाटून आलेलं आभाळ आता धाडधाड कोसळू लागलं होतं..

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.