कर्जत : दिवाळीच्या सणानिमित्त नागरिकांनी खरेदीसाठी कर्जत बाजारपेठेत गर्दी केली आहे. मग ते फराळ बनविण्यासाठी लागणाऱ्या जिन्नससाठी किराणा दुकान असो की नवीन कपडे खरेदी रेडिमेड कपड्यांची दुकाने असो याचप्रमाणे टीव्ही, फ्रिज, होम थिएटर आदी इलेक्ट्रिक उपकरणे खरेदी करण्यासाठी शोरूम असो. त्याच बरोबर आकाश कंदील, लाईंटिंगच्या रंगीबेरंगी विद्युतमाळा खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर दीपावली आनंद ओसंडून वाहताना दिसत आहेत.
बघाव तिकडे दुकानांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लाईटचा झगमगाट डोळे दिपवून टाकत आहे. कपडे विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंपर ऑफर लावली आहेत. रेडिमेड फराळ बनवून देणाऱ्यांनी खवय्यांना आकर्षित करण्यासाठी “होलसेल भावात फराळ बनवून मिळतील’ अशा जाहिरातींचा आधार घेतला आहे. विशेषकरून सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक प्रसार, प्रचार करून ग्राहक मिळविण्याचे प्रयत्नात आहेत.
दीपावली म्हटलं म्हणजे दीप, आकाश कंदील, तर आलेच. अनेक दुकानदारांनी आकर्षक असे विविध आकारातील लहान-मोठे कंदील दुकानाबाहेर लटकवून तसेच रोषणाई करणाऱ्या विद्युत तोरणे विक्रीस ठेवल्याने हा परिसर प्रकाशात न्हाऊन निघाला आहे.
पणत्या, रांगोळ्या, उटणी विक्री करणारे विक्रते रस्त्याच्या दुतर्फा बसलेले दिसून आहेत. तसेच झाडू, बत्ताशे, लाह्या यांचीही विक्री जोरात सुरू आहे. कर्जत तालुक्यातील शेतकरी बैलांना सजविण्यासाठी काव, फुगे, कवड्यांच्या माळा, रंगीबेरंगी कासरे खरेदी करीत आहेत.