“भीमाशंकर’साठी हार्वेस्टरच्या साह्याने उसतोडणी

प्रतिदिन 6 हजार मेट्रिक टन गाळप : आंबेगाव तालुक्‍यात ऊस लागवड क्षेत्र वाढले

पारगाव शिंगवे, (पुणे) – पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामातील ऊस तोडणीला सुरुवात झाली आहे. यावर्षीच्या हंगामाला करोनाची पार्श्वभूमी आहे, तसेच ऊस तोडणी संदर्भात मजुरांची मानसिकता बदलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस शेतात शिल्लक राहून नये, यासाठी भीमाशंकर कारखाना शेतकऱ्यांनी विकत घेतलेल्या 15 हार्वेस्टर यंत्राच्या साहाय्याने ऊसतोडणी करणार आहे.

दिवसेंदिवस ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ होत असून शेतकरी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करू लागलेले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात ऊस शिल्लक राहू नये यासाठी राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री व भीमाशंकर साखर कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी भीमाशंकर साखर कारखान्याने ऊस गाळप क्षमता प्रतिदिन सहा हजार मेट्रिकने वाढवली असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.

“भीमाशंकर सहकारी साखर कारखाना या गळीत हंगामात 6 हजार मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेने उसाचे गाळप करणार आहे. ऊसतोडणी कामगार आले असून, तोडणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी विकत घेतलेल्या 15 हार्वेस्टरच्या साह्याने उसाची तोडणी करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहाणार नाही. याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे.
– बाळासाहेब बेंडे, अध्यक्ष, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी लक्ष देतो आणि त्यांना ऊस लागवडीसंबंधी तसेच उसाच्या उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करीत असतो. याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. शेतकऱ्यांच्या शेतात ऊस शिल्लक न राहता तो वेळेत तोडला गेला पाहिजे हे कारखान्याचे धोरण आहे.

“करोनामुळे आणि मजुरांचा तुटवडा असल्याने ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांनी हार्वेस्टर घेतले आहेत. याच्या साह्याने उसाची तोडणी चांगली होत असून, वजनातही वाढ होणार आहे.
– दिलीप लायगुडे, ऊस उत्पादक शेतकरी व हार्वेस्टर मालक

शेतकऱ्यांच्या शेतात ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर वापर सुरू झाला असून, यावेळी माजी सभापती आनंदराव शिंदे, ऊस उत्पादक शेतकरी व हार्वेस्टरचे मालक दिलीप लायगुडे, कारखान्याचे अधिकारी दिलीप कुरकुटे, किरण गरुड, नामदेव पुंडे, संदीप ढोबळे, राजूशेठ ढोबळे, मधुकर पवार, तात्याभाऊ दाते उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.