पुणे – दिव्यांग राष्ट्रीय पुरस्कार २०२२ सोहळा महावीर प्रतिष्ठान सभागृह, सॅलिसबरी पार्क येथे उत्साहात पार पडला. यावेळी चिराग सावंत, श्रेया गाढवे, देवेंद्र डेंगळे, सुमय्या पटेल, सागर कटाळे, चिमत अंगमो यांना दिव्यांग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच हेल्पर्स संस्था कोल्हापूर, स्नेहालय संस्था अहमदनगर, कामयानी संस्था पुणे या संस्थानाचा देखील दिव्यांग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी अर्हम संस्थेच्या कार्याची प्रशंसा करताना दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचे विधेयक येत्या अधिवेशनात आणणार असल्याचे सांगितले. पुणे भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे यांनी अर्हम संस्थेच्या दिव्यांग पुरस्काराचे कौतुक करताना अशा सामाजिक कार्यात संस्थेची मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यासह सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, कौशल्य विकास विभागाचे ओएसडी श्रीपाद ढेकणे, श्रीकांत पगारिया, अर्हम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, डॉ. अतिश चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते. अर्हम सोशल वेलफेअर संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.