फलटणच्या धक्‍क्‍याने जिल्ह्याची समीकरणे बदलणार!

श्रीकांत कात्रे
सर्वच विधानसभा मतदारसंघात भाजप- शिवसेना लावणार ताकद पणाला, राष्ट्रवादीपुढे आव्हान

सातारा – लोकसभा निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण दिले. सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांचे मताधिक्‍य कमी झाले. माढ्यात तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभवाची चव चाखावी लागली. निवडणूक निकालानंतर उदयनराजेंचा मतदारसंघात संपर्क वाढला. माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संपर्काबरोबरच फलटणमधील संघर्षांची धार आणखी वाढवली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटणधील एकतर्फी वर्चस्वाला शह देण्यासाठी खेळी रंगू लागल्या. फलटणमधील हा संघर्ष मर्यादित स्वरूपात आणि निकोप वातावरणात राहिला तरच चांगले होणार आहे. जिल्ह्यातील या बदलत्या राजकारणाचा परिणाम थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजकारणावरही होऊ शकेल, असा होरा राजकीय गोटातून चर्चिला जाऊ लागला आहे.

यापूर्वीच्या राजकारणात फलटण म्हटले की रामराजे असे समीकरण ठरलेले. किंबहुना त्यामुळेच जिल्ह्याच्या राजकारणाच्या चाव्याही रामराजेंकडेच असल्याचे वातावरण होते. बारामती व्हाय फलटण असे जिल्ह्याचे राजकारण रंगायचे. रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील संघर्ष दीर्घकाळ चघळला गेला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही या संघर्षात रामराजेंच्या साथीने वाटा उचलला. उदयनराजेंचा दीड वर्षांपूर्वीचा वाढदिवस या संघर्षातच साजरा झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी वाढदिवसावर टाकलेला बहिष्कार राजकारणाला वेगळे वळण देणार अशी चिन्हे दिसू लागली. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी झालेला विरोध मावळून उदयनराजे तिसऱ्यांदा खासदार झाले. माढ्याच्या निवडणुकीत फलटण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या आघाडीने राजकीय कलाटणी दिली.

फलटणमध्ये रामराजे गटाच्या एकतर्फी वर्चस्वाला खुले आव्हान मिळू लागले. यापूर्वीही रामराजे यांना जिल्ह्यातून शह देण्यासाठी माणचे आमदार जयकुमार गोरे सातत्याने संघर्ष करीत राहिले. लोकसभा निवडणुकीवेळी आमदार गोरे यांनी खेळलेली खेळी महत्त्वपूर्ण ठरली. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये जाणे, त्यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी मिळणे आणि अनपेक्षित धक्का देत भाजपच्या गळ्यात विजयाची माळ पडणे, हे सारे एकाएकी झालेले नाही. जयकुमार गोरे यांनी लपूनछपून नव्हे तर उघड व मुत्सद्दीपणे केलेले राजकारण त्यामागे आहे. कॉंग्रेसचे आमदार असूनही त्यांनी उघड भाजपचा प्रचार करीत आघाडीधर्माला तिलांजली दिली. माणमधून भाजपला लक्षणीय आघाडी मिळाली. गोरेंचे राजकारण पक्षीय नव्हते. ते व्यक्तीकेद्रित होते. ती रामराजेंच्या विरोधातील पर्यायाने शरद पवार यांच्याविरोधातीलही खेळी ठरली. या डावपेचात गोरे यांना भाजपकडून निश्‍चितच मोठी ताकद मिळाली असणार आणि भाजप या संधीचा फायदा यापुढेही घेत राहणार, यात शंका नाही.

वास्तविक गेल्या काही वर्षांपासून वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अंतर्गत कलहामध्येच राजकारण फिरत राहिले. कॉंग्रेसची अवस्था दयनीय आहे. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी नाही. भाजपकडे जिल्ह्याच्या पातळीवरील स्थानिक नेतृत्त्व नसले तरी संघटनात्मक बांधणीचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसशिवाय इथे काही चालणार नाही, असेच वातावरण राहिले. त्यातही साताऱ्यातून उदयनराजे आणि फलटणमधून रामराजे या दोघांतील कलगीतुऱ्यानेच लक्ष वेधून घेतले. शरद पवार यांनी रामराजेंकडे चाव्या देताना उदयनराजेंनाही बरोबर घेत जिल्ह्यावर वरचष्मा ठेवला. आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून भाजप आपले मनसुबे खरे करण्यासाठी जीवाचे रान करणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

कऱ्हाड दक्षिण, उत्तर, सातारा, वाई, कोरेगाव या मतदारसंघावर भाजपने यापूर्वीपासूनच लक्ष केंद्रित केले आहे. त्यात आता आणखीनच जास्त ताकद लावली जाईल. फलटण व माणची आघाडी लक्षात घेऊन त्या मतदारसंघातही भाजप कसून ताकद लावेल. माणमध्ये गोरेच भाजपचे उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. आता कसोटी रामराजेंची लागणार आहे. ताब्यात असणाऱ्या जिल्ह्याने घेतलेले वळण पेलण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. राष्ट्रवादीची सुत्रे फलटणमधून हलत होती. त्यावरही मर्यादा येणार आहेत. पर्यायाने शरद पवार यांना व्यक्तीगतरित्या मानणारा जिल्हा म्हणून असणारी ओळख पुसण्यासाठीच आता युतीतील पक्ष विधानसभा निवडणुकीच्या मैदानातील डावपेच लढून राष्ट्रवादीला नामोहरम करण्यासाठी चंग बांधतील. फलटणचा धक्का जिल्ह्याच्या राजकारणाचे रंग बदलण्यात यशस्वी होणार की नाही, हेच नजिकच्या काळात सिद्ध होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.