पुणे – मतदानात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी आता घरोघरी भेट देऊन ‘ताई मतदानाला चला’ अभियान राबवले जाणार आहे. मागील निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावरील मतदानाची टक्केवारी वाढावी आणि ७ मे रोजी बारामती व १३ मे रोजी पुणे, मावळ आणि शिरूर मतदारसंघाच्या निवडणुकीत अधिकाधिक महिलांनी मतदान करावे यासाठी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड व पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी, पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख, पिंपरी चिंचवड तसेच उपआयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, बचत गटातील महिला, समूह संघटिका यांचे गट तयार करुन मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देणार आहेत.
महिला मतदारांचा मतदानात कमी सहभाग असलेल्या केंद्राची माहिती घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात येईल. जिल्ह्यातील ४ हजार ९०० पेक्षा जास्त मतदान केंद्र परिसरात ही मोहीम राबविण्याचे नियोजन आहे.