जामखेड – जामखेड शहरात सतरा करोनाबाधित आढळल्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सोमवारी (दि. 26) जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांचा फौजफाटा शहरात दाखल झाला. त्यांनी बाधित क्षेत्र व इतर क्षेत्राची पाहणी केली. तसेच रत्नदीप मेडिकल फाउंडेशन व डॉ. अरोळे हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षांची पाहणी केली. तसेच स्थानिक प्रशासनाला करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या.
शहरात महिनाभरापासून करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यांची साखळी तुटत नसल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी सांगळे यांनी शहरास भेट दिली. आठ दिवसांत अकरा करोनाबाधित आढळलेल्या ठिकाणी भेटी दिल्या. तसेच या परिसरात नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अत्यावश्यक सेवांबाबत अडचणी समजावून घेतल्या. याबाबत नागरिकांना घरपोच अत्यावश्यक सेवा पोहोचवल्या जातील. तुम्ही आरोग्य कर्मचाऱ्यांना तपासणीस मदत करा. तसेच नगरपरिषदेला या परिसरात घरोघरी जंतुनाशक फवारणी करण्याच्या सूचना दिल्या.
करोना रुग्णांसाठी येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या इमारतीत असलेल्या विलगीकरण कक्षाची पाहणी केली. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे पाटील यांनी याठिकाणी 100 बेडची सुविधा व सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध असल्याचे तसेच रुग्णांच्या दोन वेळा जेवण, चहा, नाश्ता दिला जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी व त्यांच्या टीमने डॉ. रजनीकांत अरोळे हॉस्पिटल येथे पाहणी केली.
यावेळी ग्रामीण आरोग्य प्रकल्पाचे संचालक रवी अरोळे, डॉ. शोभा अरोळे यांनी यापूर्वी 62 जण क्वारंटाईनमध्ये 14 दिवस होते व आता चार करोनाबाधित बरे झालेले रुग्ण येथेच उपचार घेत आहेत. तसेच यापुढे येथे 70 बेड व दुसऱ्या ठिकाणी 28 बेड तयार असून, क्वारंटाईनसाठी येणारे येथेच पाठवावेत, अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी महसूल व पोलीस प्रशासनाकडून माहिती घेतली व सूचना करून करोना साखळी तोडण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या. शहरातील इतर ठिकाणांची पाहणी केली. शहरातील जवळपास 64 रस्ते सील केले आहेत.
तसेच दोन कि. मी. पर्यंतचा परिसर हॉटस्पॉट असल्याने येथून कोणी नागरिक बाहेर जाणार नाही व कोणी येणार नाही, याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शहरातील 185 करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची स्वॅब तपासणी झाली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतः तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले.