नगर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चुरस निर्माण झाली असून, पक्षश्रेष्ठींसाठी ही निवड डोकेदुखीच ठरली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी उद्या (मंगळवार) विरोधी पक्षनेते अजित पवार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित बैठक होणार असून, या बैठकीत अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाची निवड बुधवारी (दि. 8) सकाळी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. केवळ अध्यक्ष निवडला जाणार की त्याबरोबर उपाध्यक्षपदही नव्याने निवडले जाणार, हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही. त्याचाही निर्णय मंगळवारीच दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान, पवार व थोरात यांच्या बैठकीला सर्व संचालकांना बोलविण्यात आले असून, त्यांची मते जाणून घेण्यात येणार आहेत. अर्थात सर्वांचे मते जाणून घेतल्यानंतर लगेच अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर होईल की मंगळवारी स्पष्ट होईल हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. अध्यक्षपदासाठी राहुल जगताप (श्रीगोंदा) व चंद्रशेखर घुले (शेवगाव) या दोन माजी आमदारांमध्ये रस्सीखेच आहे.
जिल्हा बॅंकेमध्ये राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे बहुमत आहे. त्यातही राष्ट्रवादीचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद कॉंग्रेसकडेच राहणार आहे. माजी आ. घुले व माजी आ. राहुल जगताप यांच्यामध्ये रस्सीखेच असली, तरी आ. आशुतोष काळे (कोपरगाव), ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर) यांचीही नावे चर्चेत आहेत. माजी आ. घुले विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडून द्यायच्या जागेसाठी इच्छुक आहेत. मात्र, ही निवडणूक बेमुदत लांबणीवर पडली आहे. घुले यांच्या पत्नी राजश्री घुले यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पक्षाकडून दिले गेले होते. याकडे लक्ष वेधत माजी आ. राहुल जगताप यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नाव निश्चितीचा फैसला मात्र मंगळवारीच होईल. जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादीचे 9, कॉंग्रेसचे 5, भाजप 3 व विखे समर्थक 3 असे संख्याबळ आहे.
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष ऍड. उदय शेळके यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. त्यामुळे अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली आहे. उपाध्यक्षपदी कट्टर थोरात समर्थक ऍड. माधवराव कानवडे यांची पूर्वीच निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष निवडीसाठी सहकार विभागाने संचालक मंडळाची बैठक बुधवारी आयोजित केली आहे. निवड बिनविरोध होणार असली, तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करायचे याचा खल गेले काही दिवस सुरू आहे. अजित पवार पाथर्डी येथील कार्यक्रम आटोपून नगरला येणार असून, त्यानंतर त्यांची थोरातांसह बॅंकेच्या संचालकाबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे.