पालख्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या दोन्ही पालख्या शुक्रवारी (दि. 28) पुणे शहरातून हडपसरमार्गे जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी पाणी, स्वच्छता, विजपुरवठा आणि शौचालय या आवश्‍यक सेवा-सुविधांची तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, वारकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी गुरूवारी (दि. 27) सर्व पाण्याच्या स्त्रोतांची, टॅंकरची माहिती घेण्यात आली आहे. तसेच आवश्‍यक त्या सूचना देखील करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी माहिती दिली.

पदाधिकाऱ्यांनी यावर्षी वारीमध्ये वारकऱ्यांना कुठलीच गैरसोय होणार नाही यासंदर्भात काळजी घेण्याच्या सूचना आढावा बैठकीत केल्या होत्या. त्या सूचनांप्रमाणे पालखी सोहळ्यासाठी सर्व ठिकाणी तयारी पूर्ण केली आहे. याचबरोबर आरोग्य विभागाचे आरोग्यदूत आणि औषधांच्या किट देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी केली आहे. पुणे जिल्हाच्या हद्दीपर्यंत कुठलीच कमतरता भासू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वच अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. मांजरीमध्ये संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी तर फुरसुंगी येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी औषधांचे वाटप केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.