श्रमिकांच्या मागण्यांसाठी अकोलेत भव्य मोर्चा 

अकोले – अकोलेत आज (दि.27) श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी माकपच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. आठवडे बाजार व आंदोलकांच्या घोषणाबाजीने अकोले दणाणून गेले होते. अकोले तहसील कार्यालयावर किसान सभा, सिटू कामगार संघटना व डी. वाय. एफ. आय. युवक संघटनेच्या वतीने 25 जूनपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले होते.

वन जमीन, घरकुल, पिण्याचे पाणी व बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात गेले तीन दिवस शेकडो श्रमिक सहभागी झाले होते. आंदोलनातील मागण्यांच्या समर्थनार्थ आज अकोले तहसील कार्यालयावर अत्यंत आक्रमक पण शिस्तबद्ध मोर्चा काढण्यात आला. आंदोलना दरम्यान गेले तीन दिवस प्रशासनाच्या वतीने आंदोलकांच्या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, वनाधिकारी भाग्यश्री पोले, कामगार सहआयुक्त पाटणकर, नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी आंदोलकांशी चर्चा करून प्रश्‍न समजून घेतले होते. आंदोलक मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी यासाठी आग्रही होते. आंदोलनाच्या या पार्श्‍वभूमीवर काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे अंमलबजावणीसाठी अत्यंत सकारात्मक दबाव तयार झाला आहे.

आंदोलनात बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. कामगार सहआयुक्त पाटणकर नगर वरून स्वतः अकोल्याला येऊन मोर्चाला सामोरे गेले. लाभाच्या अनेक फाईली मंजूर करून बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. रुंभोडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीत वन विभागाने केलेले अतिक्रमण काढून घेणे, मन्याळे येथील वन जमिनीत दांडगाईने खड्डे खोदून आदिवासींना वन जमिनीतून हुसकावून लावण्याचे प्रयत्न करणे, बेलापूर येथील जंगल जमीन धारकांचा रस्ता अडवला जाणे अशा अनेक प्रश्‍नांवर यावेळी सखोल चर्चा करून प्रश्‍न सोडविण्यासाठी ठोस कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला.

मोर्चानिमित्त पंतप्रधान आवास योजनेचा प्रश्‍न संघटनांच्यावतीने अत्यंत अग्रक्रमाने उपस्थित करण्यात आला. वंचित राहिलेल्या सर्व बेघरांना तातडीने घरकुले उपलब्ध करून द्या, ड यादीमध्ये सर्व वंचितांचा समावेश करा व यादीला मान्यता देऊन त्यांना घरकुलाचे अनुदान उपलब्ध करून द्या या प्रमुख मागण्या आंदोलकांच्या वतीने उपस्थित करण्यात आल्या.

हिवरगाव येथील ठाकर वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी पाईपलाईन करण्याचे यावेळी मान्य करण्यात आले.अकोले, संगमनेर, कोपरगाव तालुक्‍यातील बांधकाम कामगार, शेतकरी व युवक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, साहेबराव घोडे,ज्ञानेश्‍वर काकड, रोहिणी नवले, शांताराम वारे, संदीप शिंदे, भाऊपाटील मालुंजकर, सीताबाई गोपाळे, राजू गंभीरे, संजय पवार, नंदू गावंडे, मंदा मुंगसे, हरीश धोंगडे, बाळशीराम बर्डे, एकनाथ बर्डे, दिलीप हिंदोळे, बाळू मधे, वाळीबा मेंगाळ, नामदेव बांडे आदी कार्यकर्त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.