निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत प्रक्रिया पार पडणार
पुणे  – विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, त्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील 21 मतदारसंघांत ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, यंदा तरूण मतदारांची संख्याही 59 हजारांनी वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 76 लाख 86 हजार 636 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात ही पत्रकार परिषद झाली. त्यावेळी नवलकिशोर राम यांनी निवडणुकीचे वेळापत्रक आणि प्रशासनाची तयारी याबाबत माहिती दिली. यावेळी ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मृणालिनी सावंत उपस्थित होते.

पुणे शहरात 8, पिंपरी-चिंचवड 4 आणि ग्रामीण भागात 9 मतदार संघ आहेत. जिल्ह्यात एकूण 76 लाख 86 हजार 636 हजार मतदारांपैकी 40 लाख 19 हजार 664 पुरुष, तर 36 लाख 66 हजार 744 मतदार महिला आहेत. यामध्ये 1 लाख 13 हजार 606 नवीन मतदारांचा समावेश झाला आहे. तर 228 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे.

याचबरोबर जिल्ह्यात 7 हजार 923 मतदार केंद्र असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तर जिल्ह्यात 190 संवदेनशील मतदारसंघ आहेत. विधानसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी 70 हजार कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. एकाच टप्प्यात निवडणूक होणार असल्यामुळे प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. त्याबाबत कर्मचाऱ्यांना तातडीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेची निवडणूक प्रक्रिया शांतेत होण्यासाठी नागरिकांनाही प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्‍केवारी वाढावी, यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याबाबत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून सर्व मतदारांपर्यंत स्लिप पोहोचविण्यात येणार आहे. त्यामुळे मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, तर तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा.

– नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here