वॉशिंग्टन : अफगाणिस्तानात गेली 19 वर्ष जे युद्ध सुरू आहे त्यात यापुर्वी कधीही नव्हता इतका मोठा तडाखा आम्ही तालिबानला दिला आहे. त्यामुळेच त्यांना आता केल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
तालिबान्यांनी अलिकडेच काबुलवर हल्ला केला त्यात एका अमेरिकन सैनिकासह एकूण 11 जण ठार झाले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी तालिबानबरोबरची शांततेची चर्चा थांबवून तालिबानला मोठे तडाखे द्यायला सुरूवात केली आहे त्यामुळे त्यांना आता काबुल वर केलेल्या हल्ल्याचा पश्चाताप होत असेल असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊस मध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की आम्ही त्यांच्याशी चर्चा करून शांतता प्रस्थापनेचा प्रयत्न करीत होतो. पण त्यांना शस्त्रसंघर्ष थांबवता आला नाही. त्यामुळे त्यांना आता आम्हीं धडा शिकवण्याचा चंगच बांधला आहे असेही ट्रम्प यांनी नमूद केले. अमेरिका आणि तालिबान यांच्यात चर्चेच्या एकूण नऊ फेऱ्या झाल्या होत्या. व ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असतानाच तालिबानने काबुल वर हल्ला केला. त्यामुळे अमेरिकेने ही चर्चेची प्रक्रियाच बंद केली आहे.